पुणे, दिनांक १४ सप्टेंबर २०२३: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या ‘पुणेरी मेट्रो’ प्रकल्पाचे एकूण काम शाश्वत गतीने पुढे सरकत आहे. विशेषतः या मार्गावरील खांब उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या २३.३ किमी मार्गावर एकूण ९२३ खांब नियोजित असून त्यापैकी ७१५ खांबांची (सुमारे ८०%) उभारणी आता पूर्ण झालेली आहे. गणेशखिंड रस्त्यावर कृषि महाविद्यालय चौकाच्या अलीकडे आज (गुरुवारी) या मेट्रोचा ७१५ वा खांब उभा करण्यात आला. विशेष नमूद करण्याजोगी बाब म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये गणेशखिंड रस्त्यावर पहिल्या खांबाचे कास्टिंग केल्यानंतर पुढे अवघ्या १७ महिन्यांत ७०० खांब उभरणीचा टप्पा ओलंडण्याची उल्लेखनीय कामगिरी पुणे मेट्रो लाईन ३ च्या विकसकांनी करून दाखविली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’ तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.
खांब उभारणीच्या जोडीला पुणे मेट्रो लाईन ३ साठीच्या पाईल कॅपचे काम देखील अंतिम टप्प्यात पोचले असून ९२३ पैकी ८१० पाईल कॅपची उभारणी आता पूर्ण झालेली आहे. या मार्गिकेवरील खांब २००० मिमी व्यासाचा घाट असणारे आणि मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या आरेखन मापदंडांशी पूर्णपणे सुसंगत असे साकारण्यात येत असल्याचे पुणे मेट्रो लाईन ३ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांत गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण आहे.
पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:
पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
‘तर एखाद्याला मीच निलंबित करेल’ – गैरप्रकारांवरून अजितदादांची पोलिसांनाच तंबी
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू