April 30, 2024

क्रेडाई देणार भावी अभियंत्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण

पुणे, दि. १७ एप्रिल, २०२४ : कौशल्यपूर्ण शहर अभियंते (सिव्हील इंजिनीअर्स) तयार व्हावेत, या अपेक्षेने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आता भावी अभियंत्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासंदर्भात आज क्रेडाई पुणे मेट्रो आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे (व्हीआयआयटी) यांमध्ये एक ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला.

कॅम्प परिसरातील क्रेडाई पुणे मेट्रोच्या कार्यालयात क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे आणि व्हीआयआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त भरत अगरवाल आणि यांनी यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. क्रेडाई पुणे मेट्रो, क्रेडाई कुशलचे कपिल त्रिमल आणि कुशल क्रेडाई टीम या  सर्वांनी एकत्रितपणे हा भविष्यवेधी उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना रणजीत नाईकनवरे म्हणाले, “पुण्याच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राचा आलेख नजीकच्या भविष्यात चढता राहण्याची शक्यता वर्तवली जात असताना  दुसरीकडे आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून आलेल्या अभियंत्यांमध्ये प्रकल्प ठिकाणी होणाऱ्या कामाचा अनुभव व अपेक्षित, आवश्यक कौशल्य नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. काही अभियंते हे इंटर्नशिप करीत असले तरी ती अभियंता म्हणून विषयाचे सर्वांग आकलन करून देणारी नसते. त्यामुळे विद्यार्थांना या विषयाचे ३६० डिग्री सर्वांग ज्ञान मिळावे शिवाय हे ज्ञान पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जात प्रात्यक्षिक आणि कौशल्याधारीत प्रशिक्षण देणारे असावे, हा विचार करीत असताना हा अनोखा ‘अपस्किलिंग’ कार्यक्रम आम्ही तयार केला. केवळ इथवरच न थांबत यामध्ये बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते अगदी शेवटच्या फिनिशिंगच्या टप्प्यापर्यंत सर्व बाबींचा अंतर्भाव देखील केला. आता या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे याचा आनंद आहे.”

याद्वारे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच प्रात्यक्षिक आणि प्रकल्प ठिकाणच्या प्रशिक्षणाचा अनुभव मिळू शकणार आहे. ५ सेमिस्टरपर्यंत हा प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थांना पूर्ण करता येईल. क्रेडाईचे सभासद असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी २०० तास प्रत्यक्ष काम करण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याद्वारे पदवीधर सिव्हिल इंजिनीअर्सना सर्वसमावेशक व्यावहारिक, ऑन-साइट प्रशिक्षण देण्यासोबतच बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान व कौशल्ये शिकविण्यासाठी क्रेडाई कटिबद्ध असेल, असेही नाईकनवरे यांनी नमूद केले.

भरत अगरवाल म्हणाले, “शैक्षणिक आणि उद्योगसंस्था यांनी एकत्र येत काम करायला हवे असे मत अनेकजण मांडतात मात्र त्यासाठी प्रयत्न करीत उपक्रम राबविण्याचे काम करणारे कमी असतात. आज क्रेडाईच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळणे ही आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. देशातील असा हा पहिलाच प्रयत्न असून यामध्ये आम्ही सहभागी आहोत ही अभिमानाची बाब आहे. या उपक्रमाद्वारे नवअभियंत्यांना सामावून घेणारी परिसंस्था तयार होईल असा आम्हाला विश्वास आहे.” आज केवळ वर्गांत बसून शिकण्याबरोबरच प्रकल्प ठिकाणी जाऊन व्यावहारिक बाबी शिकण्याकडे, स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकडे विद्यार्थांचा कल असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण मिळू शकणार आहे याचा आम्हाला आनंद आहे.”

सदर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा आम्ही उल्लेख करणार आहोत, अशी माहितीही अगरवाल यांनी दिली.

समीर बेलवलकर यांनी प्रास्ताविक केले. कपिल त्रिमल यांनी क्रेडाई कुशल उपक्रमाची माहिती दिली, डॉ श्रीकांत शिंदे यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया यावेळी सर्वांसमोर मांडल्या.

क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव अश्विन त्रिमल, क्रेडाईच्या माध्यम समितीचे समन्वयक कपिल गांधी, क्रेडाई कुशलचे सहसचिव समीर बेलवलकर, सदस्य मिलिंद तलाठी, क्रेडाई कुशल कार्यक्रमाचे समन्वयक कपिल त्रिमल, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का, व्हीआयआयटी-पुणेचे संचालक डॉ विवेक देशपांडे, कॉर्पोरेट रिलेशन्स विभागाचे संचालक डॉ अतुल कुलकर्णी, सिव्हील इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख डॉ श्रीकांत शिंदे, सहाय्यक प्रोफेसर डॉ अर्चना तनवडे आदी मान्यवर या कार्यक्रमावेळी उपस्थित होते.

कुशल हा उपक्रम क्रेडाईचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून यामध्ये बांधकाम कामगारांना वेळोवेळी आवश्यक ते कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. मागील १२ वर्षे सातत्याने हा उपक्रम सुरु असून बांधकाम कामगारांसाठी हिरीरीने क्रेडाई कुशल कार्यरत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम, बांधकाम कामगारांचे कल्याण, मजुरांचे आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण, क्रेशे असे अनेक उपक्रम क्रेडाई कुशल हाती घेत पूर्णत्वास नेत असते हे विशेष.