May 10, 2024

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात; चार दिवसांत नऊ सभा

पुणे, २७ एप्रिल २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १४ उमेदवारांसाठी अवघ्या चार दिवसांत नऊ जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर, बीड आणि नगर जिल्ह्यांत या सभा होणार आहेत. त्यातही २९ आणि ३० एप्रिल या दोन दिवशी प्रत्येकी तीन अशा सहा प्रचार सभा होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एप्रिलच्या अखेरीस चांगलेच तापणार आहे.

राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले असून, तिसऱ्या टप्यातील प्रचाराला वेग आला आहे. तिसरा आणि चौथा टप्प्यात प्रत्येकी ११ जागांवर मतदान होत असून, या दोन टप्यांमध्येअवघ्या सात दिवसांचे अंतर आहेत. या दोन्हीही टप्प्यांत सर्वाधिक मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आहेत. याशिवाय रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, रावेर या कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघाचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील दोन्हीही जागांसाठी १३ मोदी मतदारांना आवाहन करतील.

पुणे शहरात रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोंदीची सोमवारी (२९ एप्रिल) सभा होणार असून, सभेसाठीच्या मंडप उभारणीचे काम सध्या सुरू आहे. मे रोजी मतदान होत असून, या मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्राचा प्रभाव आहे.सोलापूर आणि माढा येथील दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत. या दोन्हीही जागा भारतीय जनता पक्ष लढवत आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सातारा येथेही मोदी प्रचार करणार आहेत. कोल्हापुरात काँग्रेसबरोबर असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पराभवाचे, तर कराड येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी पंतप्रधान सभा घेणार आहेत.

शिंदेचा हट्ट आणि कोल्हापूरची सभा

कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा नियोजित नव्हती. मात्र, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ऐन वेळी कोल्हापूर येथील सभेला
परवानगी देऊन अवघ्या दोन दिवसांत सभेची तयारी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज, २७ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर येथे ही सभा होत आहे.

पुण्यातील सभा लक्षणीय ठरणार ?
पुणे शहरात रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान मोंदीची सोमवारी (२९ एप्रिल) सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले असून, या वेळी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. या सभेत सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी मोदींकडून आवाहन केले जाणार आहे. या वेळी ते ज्येष्ठ नेते शरद पवारांबाबत काय भूमिका घेतात, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. रेसकोर्सवर होणारी सभा ही पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी असणार आहे. या सभेसाठी किमान दीड लाख नागरिकांना जमविण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले असून, शुक्रवारी अजित पवारांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पुण्यात पार पडली आहे.

असे आहे पंतप्रधान मोदींच्या सभांचे नियोजन

२७ एप्रिल
तपोवन मैदान, कळंबा, कोल्हापूर
सायंकाळी ५
२९ एप्रिल
होम मैदान, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर
दुपारी २.१५
२९ एप्रिल
बीज गुणन केंद्र, कृषी डेपो मैदान, कराड
दुपारी ४
२९ एप्रिल
रेसकोर्स, पुणे
सायंकाळी ६
३० एप्रिल
शेती महामंडळ मैदान, माळशिरस, सोलापूर सकाळी ११.३०
३० एप्रिल
धाराशिव
दुपारी १.३०
३० एप्रिल
बिर्ले फार्म, लातूर
सायंकाळी ५
६ मे
बीड
दुपारी ३.३०
६ मे
राहुरी
सायंकाळी ५.३०