पुणे, दि. ३ मार्च, २०२३ : कुशल क्रेडाई – पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम प्रकल्पावरील अभियंते आणि तंत्रज्ञ यांचे अद्ययावतीकरण अर्थात ‘अप स्कीलिंग’ करण्याच्या हेतूने विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा क्रेडाई – पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे अध्यक्ष जे पी श्रॉफ यांनी केली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुशल क्रेडाई – पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम प्रकल्पावरील अभियंत्यांसोबतच पर्यवेक्षक, स्टोअर मॅनेजर, सुरक्षा अधिकारी अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांना विविध विषयांच्या अभ्यासक्रमांच्या मदतीने कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार असून येत्या १ एप्रिलपासून विविध अभ्यासक्रमांचा समावेश असलेले हे प्रशिक्षण सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे श्रॉफ यांनी यावेळी नमूद केले.
क्रेडाई- पुणे मेट्रोच्या कार्यालयात या प्रशिक्षणासंदर्भात बांधकाम प्रकल्पावरील अभियंते आणि तंत्रज्ञ यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात श्रॉफ बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, कुशल क्रेडाईच्या समितीचे सदस्य समीर बेलवलकर, कपिल त्रिमल, क्रेडाई कार्यालयातील जनरल मॅनेजर (तांत्रिक) पल्लवी कोठारी, समीर पारखी यांबरोबरच क्रेडाई – पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, सरव्यवस्थापिका उर्मिला जुल्का आदी उपस्थित होते.
सदर अभ्यासक्रम हे नजीकच्या भविष्यात कौशल्याधारित अभियंते आणि तंत्रज्ञ निर्माण करण्याच्या प्रवासात मैलाचा दगड ठरतील असे सांगत अभियंते आणि तंत्रज्ञ यांनी या प्रशिक्षणाचा फायदा मोठ्या प्रमाणात आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी करून घ्यावा, असे आवाहन रणजीत नाईकनवरे यांनी केले.
आज काळाप्रमाणे स्वत:ला अद्ययावत करणे ही बांधकाम व्यवसायाची गरज आहे. हे करीत असताना मागणी आणि कौशल्यांची उपलब्धता यातील तफावत लक्षात घेऊन आम्ही विविध अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहभागी तंत्रज्ञांना क्रेडाईच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल, असे श्रॉफ यांनी सांगितले.
अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे मूल्यांकन करून नंतरच त्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगत पल्लवी कोठारी म्हणाल्या, “बांधकाम क्षेत्रातील नवे कौशल्य आणि प्रशिक्षणाची माहिती यांची आवश्यकता लक्षात घेत आम्ही हे अभ्यासक्रम सुरु करीत आहोत. यामध्ये बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सहभागी व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.”
सदर अभ्यासक्रमाअंतर्गत अनेकविध कार्यशाळा, क्लासरूम प्रशिक्षण यांबरोबरच बांधकाम प्रकल्पावरील प्रात्यक्षिके यांचा समावेश असणार असून अभ्यासक्रमानुसार यांचा कालावधी हा १५ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंतचा असेल. अभ्यासक्रमाअंतर्गत साईट प्लॅनिंग वर्कशॉप, तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी आरपीएल संदर्भातील अभ्यासक्रम, प्रकल्पावरील दिवसाचे नियोजन, प्रकल्पाच्या ठिकाणची सुरक्षितता, प्रकल्प व्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन, महारेरामधील तांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच गुणवत्ता व्यवस्थापन, प्रगत तंत्रज्ञान, हरित बांधकाम आणि बांधकाम उद्योगातील विविध सॉफ्टवेअर्स आदी विषयांवर देखील कार्यशाळा होणार आहेत.
More Stories
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत
औरंगजेबाची कबर हटवयन्याची विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी ः अनयथा राज्यव्यापी ‘क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव’ आंदोलनचा इशारा