पिंपरी, २४ जून २०२३: शहरातील नागरिकांसाठी आवश्यक सोईसुविधा पुरविण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते, आज सुरू करण्यात येत असलेल्या ‘’टॉयलेटसेवा’’ ऍपद्वारे केवळ शहरातील नव्हे तर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, नागरिक, व्यावसायिक तसेच प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक यांसह अनेकांना पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छतागृहांची उपलब्धता एका क्लिकवर मिळणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये शहरातील २३८ सार्वजनिक स्वच्छतागृहांची ठिकाणे, सुविधांसह माहिती असलेल्या उपयुक्त अशा ‘टॉयलेटसेवा’ ऍपचे लोकार्पण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, टॉयलेटसेवा ऍप विकसित करणारे अमोल भिंगे, तसेच त्यांचे सहकारी प्रितम चोपडा, सोनाली चोपडा, क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, शितल वाकडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत समन्वयक सोनम देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, बाळासाहेब कांबळे, शांताराम माने, तानाजी दाते, राजू साबळे, राजेश भाट, वसंत सरोदे आदी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधण्यासाठी तसेच वापरानंतर त्या शौचालयाच्या स्थितीबाबत प्रतिसाद देण्यासाठी, तक्रारी नोंदविण्यासाठी इ. सुविधा उपलब्ध असलेले ‘’टॉयलेटसेवा’’ ऍप तयार केले असून त्यामध्ये शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत माहिती उपलब्ध आहे. तसेच या ऍपद्वारे उपलब्ध स्वच्छतागृहांमधील सुविधा तसेच तृटींबाबत तक्रारी नोंदविता येणार असून त्याची दखल आरोग्य विभागामार्फत घेतली जाणार आहे.
‘टॉयलेटसेवा’ या विनामुल्य ऍपद्वारे नागरिकांना स्वच्छतागृह शोधणे, स्वच्छतागृहाची माहिती संकलित करणे, स्वच्छतागृहात असणाऱ्या सुविधा पाहणे किंवा त्यानुसार वॉश बेसिन, पाणी, लिक्वीड सोप किंवा सॅनिटायझर, डस्टबिन, लाईट्स, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स इ. सुविधांबाबत माहिती व प्रतिसाद देणे अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ऍपद्वारे नागरिकांना ऍपमध्ये नमूद महापालिका किंवा खाजगी स्वच्छतागृह स्वच्छ आहे की अस्वच्छ, तेथे असलेल्या सुविधांवरून अभिप्राय देता येतील, शिवाय नागरिकांकडून रेटिंगसुद्धा देता येतील अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ‘’टॉयलेटसेवा’’ ऍपचा वापर करावा तसेच आजूबाजूस व आपल्या परिचितांना, नातेवाईकांना या सुविधेबाबत माहिती द्यावी, बारकोड किंवा लिंक शेअर करावी आणि शहराच्या आरोग्य विषयक कामकाजात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी तर सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मानले.
‘’टॉयलेटसेवा’’ ऍपसाठी खालील लिंक क्लिक करा-
(https://play.google.com/store/apps/details?id=com.palsak.searchtoilet)
More Stories
पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कुष्ठरोग वसाहतीमध्ये मतदान जनजागृती
चिंचवडमध्ये भाजप उमेदवार बदलणार, जगताप कुटुंबाचा मोठा निर्णय
पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन