May 4, 2024

एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेसाठी अंकिता रैना, ऋतुजा भोसलेसह चार भारतीयांना मिळणार वाईल्ड कार्ड

मुंबई १ फेब्रुवारी २०२४: भारतीय खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर खेळण्याची संधी आणि जागतिक दर्जाची स्पर्धा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अंकिता रैना, सहजा यमलापल्ली आणि ऋतुजा भोसले या भारताच्या पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंसह उदयोन्मुख कुमार खेळाडू वैष्णवी आडकर यांना  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन टेनिस या डब्लूटीए मालिकेतील सव्वा लाख डॉलर्स पारितोषिक रकमेच्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत एकेरीसाठी वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे.
या संदर्भात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना आयोजन समितीचे सदस्य श्री संजय खंदारे आणि श्री प्रविण दराडे यांनी सांगितले की, ”जागतिक दर्जाचीही स्पर्धा भारतात परत आल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आमच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध होईल. देशातील महिला टेनिसला पुढे येऊन पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही आमचे प्रायोजक एल अॅण्ड टी यांचेही आभार मानतो. वर्षाच्या सुरुवातीला अशी मोठी स्पर्धा आयोजित केल्यामुळे आमच्या खेळाडूंना त्यांची क्रमवारी सुधारण्यास आणि जागतिक स्तरावरील उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पुरेसा अनुभव मिळेल.” अशी मला खात्री आहे वाटते.
‘आमच्या खेळाडूंना विविध कारणांमुळे अशा उच्च स्तरीय स्पर्धा खेळायला मिळत नाहीत. म्हणूनच आम्ही येथे ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून भारतीयांना किमान ८ ते १० डब्लूटीए मानांकन गुण मिळवण्याची संधी मिळू शकेल. जागतिक क्रमवारी सुधारण्यासाठी याचा खेळाडूंनाच फायदा होणार आहे,’ असेही श्री. खंदारे व श्री दराडे यांनी सांगितले.
 
एमएसएलटीएचे चेअरमन श्री. प्रशांत सुतार यांनी महाराष्ट्र सरकारच्या सतत पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. ‘टेनिसला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही एटीपी टूर, डेव्हिस करंडक, एटीपी चॅलेंजर्स आणि डब्लूटीए १२५ पारितोषिक रकमेची स्पर्धा आयोजित करू शकलो,’ असे श्री.सुतार यांनी सांगितले. 
ते पुढे म्हणाले, ‘सरकारच्या पाठिंब्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी लक्ष्यवेध प्रकल्प सुरु करत आहोत. या उपक्रमातंर्गत, आम्ही पुण्यात जागतिकद र्जाची टेनिस अकादमी सुरु करण्यासाठी जेसी फेरेरो अकादमीशी करार केला आहे.’ 
एमएसएलटीएचे अध्यक्ष श्री. भरत ओझा म्हणाले, ”२०२३-२४मध्ये एमएसएलटीएने सोलापूर, नवी मुंबई, नागपूर, पुणे आणि मुंबई येथे महिला आणि पुरुष गटातून ३.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हे भारतातील कोणत्याची संघटनेच्यापेक्षा सर्वोच्च आहे. भारतीय टेनिसमध्ये एमएसएलटीएचे योगदान खूप मोठे आहे आणि एल अॅण्ड टी मुंबई ओपन ही भारताच्या वार्षिक कार्यक्रमातील सर्वात मोठी टेनिस स्पर्धा आहे.” 
 
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस उपसमितीचे चेअरमन श्री संजू कोठारी म्हणाले,  ‘या प्रतिष्ठीत जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे पुन्हा आयोजन करणे ही सीसीआयसाठी एक अभिमानाची बाब आहे. आम्ही जागतिक दर्जाच्या खेळाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डब्लूटीएने ठरवून दिलेल्या मानांकनानुसार सीसीआयने नवीन टेनिस कोर्ट तयार केली आहेत. त्याचबरोबर एक हजार प्रेक्षक क्षमतेचे सेंटर कोर्टही देखिल तयार केले आहे. ‘
‘आम्ही आमचे अध्यक्ष, समिती आणि आमच्या सदस्यांचे या स्पर्धेला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो. सीसीआय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी नेहमीच आघाडीवर असते आणि आम्ही आशा करतो की शहरातील टेनिसप्रेमी या आठवड्यात जागतिक दर्जाच्या टेनिसचा आनंद घेतील ‘ , असेही कोठारी म्हणाले. 
 
एमएसएलटीएचे मानद सचिव श्री सुंदर अय्यर म्हणाले की, स्पर्धेच्या  पात्रता फेरीचे सामने आठवड्याच्या शेवटी (३ आणि ४ फेब्रुवारी) होणार असून मुख्य फेरीस सोमवार ५ फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे आणि अंतिम सामना ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे निरीक्षक केरिलीन क्रॅमर यांच्या नेतृत्वाखाली १० आंतरराष्ट्रीय सदस्यांचे पथक या स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम करणार आहेत. भारताच्या गोल्ड बॅज रेफ्री शितल अय्यर या स्पर्धेच्या रेफ्री असणार असून, लीना नागेशकर या मुख्य अधिकारी असणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.  
 
श्री अय्यर पुढे म्हणाले, ‘एल अॅण्ड टी व्यतिरिक्त आम्ही एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) क्रीडा विभाग, सिडको, म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण), अधिकृत वैद्यकीय सुविधा पुरविणारे सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल, एनर्जी ड्रिंक पार्टनर एनर्जील, अॅक्वा पार्टनर  अम्रेट लो ड्युटेरियम वॉटर आणि अधिकृत रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी यांचेही आभार मानतो.
 
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये प्रविण दराडे (आयएएस), श्री.संजय खंदारे (आयएएस), श्री. भरत ओझा, श्री. प्रशांत सुतार, सौ. पल्लवी दराडे, श्री. संजू कोठारी, श्री. लव कोठारी सीसीआय टेनिस सचिव, श्री. किशन शहा, सौ.संगीता जैन आणि सुंदर अय्यर यांचा  समावेश करण्यात आला आहे. 
 
एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १२५ मालिकेबद्दल
एल अॅण्ड टी मुंबई ओपन टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सहा वर्षांनी मुंबईत परतत आहे. या स्पर्धेत २०१७ मध्ये नवी ऑस्ट्रेलियन ओपन विजेती आर्यना सबालेन्काने किशोर वयातच पहिल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. थायलंडच्या लुक्सिका कुमखुमने २०१८ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.