April 28, 2024

अवयवप्रत्यारोपणासाठी आवश्यक मदतीच्या जागृकतेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘बेबसी’ या लघुपटाचे प्रदर्शन

पुणे, दि. २३ मार्च, २०२४ : सर्वसामान्य नागरिकांमध्ये आज अवयवदानासंदर्भात जनजागृती गरजेची आहेच मात्र हे होत असताना अवयव प्रत्यारोपण करताना येणाऱ्या अडचणींची त्यांना कल्पना असावी. शिवाय त्यासाठी असलेल्या सरकारी योजना, मोठ्या औद्योगिक कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत करता येऊ शकणारी मदत या सर्वांची देखील त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राहुल पणशीकर दिग्दर्शित ‘बेबसी’ या लघुपटाचे प्रदर्शन आज संपन्न झाले.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील एनएफएनआय या ठिकाणी हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. राहुलस् ग्राफिक्स या संस्थेच्या वतीने या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे विशेष सहाय्य यासाठी लाभले आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, कोटबागी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ महेश कोटबागी, गुन्हे अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक डॉ संजय शिंदे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, अवयवदाना संदर्भात गेली अनेक वर्ष सोलापूर शहरात जनजागृती करणारे डॉ हरीश रायचूर, डॉ स्नेहा घारमळकर आदी मान्यवर आणि लघुपटातील सर्व कलाकार यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी या लघुपटात भूमिका साकारली आहे.

राहुल पणशीकर यांनी या आधी प्रदर्शित केलेल्या ‘राख’ आणि ‘दुविधा’ या लघुपटांचा पुढचा भाग म्हणजे ‘बेबसी’ हा लघुपट असून यामध्ये गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या एका तत्त्वनिष्ठ व्यक्तीच्या कुटुंबासोबतची घटना दाखविण्यात आली आहे. लघुपटातील प्रमुख पात्र असलेले तात्यासाहेब हे गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून आपले घरही गहाण ठेऊन त्यांना शाळा बांधून शिकविण्याचा प्रयत्न करत असतात. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा मुलगा एके ठिकाणी नोकरीला लागलेला असतो. दोन दिवसात तो नोकरीवर रुजू होणार या आनंदात असलेल्या कुटुंबाला त्याला गंभीर आजार झाला असून आता आपल्या मुलाचे यकृत प्रत्यारोपण करावे लागणार हे समजते. आपल्या मुलाकडे अगदी ३-४ आठवडे इतकाच वेळ आहे हे समजल्यानंतर त्या कुटुंबाची झालेली अवस्था, समाजातील काही संवेदनशील व्यक्तींनी केलेली मदत या सर्वांचे भावस्पर्शी चित्रण बेबसी या लघुपटात करण्यात आले आहे.

आपला मुलगा गेल्यानंतर सर्वसामान्य गरिबांना या दु:खातून जावे लागू नये आणि वेळेत मदतीचे पर्याय उपलब्ध व्हावे या उद्देशाने अवयवदान प्रत्यारोपण व डायलेसिससाठी सरकारी योजनांचा पाठपुरावा, यासाठी मोठ्या औद्योगिक कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत मदत मिळण्यासाठी त्याचा सीएसआरमध्ये समावेश करून घेणे यासाठी तात्यासाहेब प्रयत्न करतात आणि या प्रयत्नांना आलेल्या यशाने हे मदतीचे पर्याय लघुपटाद्वारे प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अवयव प्रत्यारोपण करताना अधिकृत रुग्णालये, सामाजिक संस्था, सरकारी संस्था यांकडूनच मदत घ्यावी असे आवाहन या लघुपटात करण्यात आले असून अवैध्यरीत्या होणाऱ्या अवयवप्रत्यारोपणाच्या बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी जागृतीदेखील करण्यात आली आहे हे विशेष.

कोणताही चित्रपट, लघुपट हा सामाजिक बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो म्हणून अवयव प्रत्यारोपण मदतीसाठी उपलब्ध असलेले पर्याय समोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे राहुल पणशीकर यांनी सांगितले.

अवयवप्रत्यारोपण आणि यादरम्यान रुग्णांना लागणारे डायलेसिस यासाठी लाखो रुपये खर्च होत असताना सरकारी आणि सीएसआर अंतर्गत मिळणारी मदत याची माहितीच नागरिकांना नाही या बद्दल जागृती करणे महत्त्वाचे असल्याचे निरंजन किर्लोस्कर यांनी नमूद केले.

अवयव प्रत्यारोपणाची मदत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचविण्यामध्ये हा लघुपट महत्त्वाचे काम करेल असा विश्वास यावेळी डॉ संजय शिंदे यांनी व्यक्त केला. १९९४ सालापासून कायदा आल्यानंतर अवयवदान जागृतीला गती मिळाली असे सांगत माणूसपणाची संवेदना आणि माणुसकीचा शोध या लघुपटातून दाखविला असल्याचे मिलिंद मोहिते म्हणाले.

अवयव प्रत्यारोपण होईपर्यंत रुग्ण मृत्यूच्या छायेत असतोच यासोबत यासाठी येत असलेल्या खर्चाने ती छाया आणखी दाट होते म्हणून समाजाने एकत्रित येत जास्तीत जास्त मोफत डायलेसिस सेंटर सुरु करावी आणि जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत याची माहिती पोहोचवावी असे आवाहन डॉ महेश कोटबागी यांनी केले. राहुल पणशीकर यांनी प्रास्ताविक करीत उपस्थितांचे आभार मानले.