July 24, 2024

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 20 देशांतील खेळाडू झुंजणार

पुणे,दि.29 नोव्हेंबर 2023: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 20 देशांतील अव्वल कुमार खेळाडू सहभागी झाले आहे. यामध्ये मुलांच्या गटात रशियाच्या इव्हान इउत्किन याला तर मुलींच्या गटात फ्रांसच्या डून वैसौद यांना ग्रमानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे दि. 2 ते 9 डिसेंबर 2023या कालावधीत रंगणार आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे म्हणाले की, गतवर्षी या स्पर्धेत 11 देशातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. मात्र, यंदाच्या वर्षी या स्पर्धेत 20 देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता जगभरात वाढत चालली असल्याचे चित्र दिसत आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे.

तसेच, घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण आयटीएफ गुण मिळवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. स्पर्धेतील एकेरीतील मुले व मुलींच्या गटातील विजेत्या खेळाडूला एमव्ही देव स्मृती करंडक आणि 100 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या खेळाडूला 60 आयटीएफ गुण देण्यात येणार आहेत. दुहेरीतील विजेत्यांना 75 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या 45आयटीएफ गुण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आश्विन गिरमे पुढे म्हणाले की, गेल्या 9वर्षांपासून अर्जुन गद्रे आणि गद्रे मरिन तसेच, एमएसएलटीए यांनी या स्पर्धेला पाठिंबा दिल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंना 2024 मध्ये होणा-या ऑस्ट्रेलीयन ओपन ज्युनियर स्पर्धेत अधिक गुण मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल.

स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि रत्नागिरी व गोवाव्यतिरिक्त भारतातील सर्वात मोठी मरिन हाऊस एक्स्पोर्ट असलेले गद्रे मरीनचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे म्हणाले की, 2023मधील स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यामध्ये 20 विविध देशांतील कुमार खेळाडूंनी सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे यावर्षी अव्वल कुमार खेळाडूंमधील चुरशीची अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आमच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील आणि भारतीय खेळाडूंना या स्पर्धेचा नक्कीच फायदा होईल अशी अशा असल्याचे त्यांनी सांगितले. गद्रे मरिन नेहमीच क्रीडा स्पर्धांना पाठिंबा देत असून आपला प्लांट स्थापित असलेल्या रत्नागिरी येथे गद्रे मरिनने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेलादेखील पाठिंबा दिला आहे.

गद्रे मरिन्स्‌ एक्स्पोर्टचे विभागीय वितरण व्यवस्थापक आश्विनकुमार जंगम म्हणाले की, मरिनच्या आरोग्यदायी उत्पादनाचा नक्कीच फायदा होईल. यासाठी सर्व खेळाडूंना स्पर्धेदरम्यान हि उत्पादने देण्यात येणार आहेत.

लीना नागेशकर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना सोमवार,दि.4 डिसेंबर या दिवशी सुरूवात होणार असून पात्रता फेरीचे सामने शनिवारी 2 डिसेंबर व रविवारी 3 डिसेंबर या दिवशी होणार आहेत. गतवर्षी या स्पर्धेत मुलींच्या गटात फ्रांसच्या मार्गोट फंथाला हिने तर, मुलांच्या गटात अलेक्झांडर डस्कालोविक याने विजेतेपद संपादन केले होते.

स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले:
1.इव्हान इउत्किन(रशिया, 160), 2. क्रिश त्यागी (भारत,178), 3.काहिर वारिक(भारत,274), 4. काझुमा किमुरा (जपान,276), 5. हितेश चौहान (भारत,280), 6. देबसिस साहू (भारत, 291), 7. रेथिन प्रणव सेंथिल कुमार (भारत, 309), 8. जुआन किम (कोरिया, 327);

मुली
मुली: 1. डून वैसौद (फ्रांस, 135), 2. माया राजेश्वरन रेवती (भारत, 238), 3. मंडेगर फरजामी (इराण, 304), 4. तेजस्वी दबस (भारत, 435), 5. जो-लीन सॉ( मलेशिया, 456), 6. यास्मिन वावरोवा(स्लोव्हाकिया,505), 7. सोहिनी संजय मोहंती (भारत, 528), 8. लीला आखमिटोव्हा(587).