March 16, 2026

पुण्यात गॅस दाहिन्या सुरूच राहणार

पुणे, १० मार्च २०२६ : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रोपेन आणि ब्यूटेन या घटकांचा प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरात औद्योगिक आणि इतर वापरासाठी गॅस उपलब्धतेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका हद्दीतील गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या विद्युत विभागाने घेतला होता. मात्र, संबंधित गॅस कंपन्यांकडून सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे उपलब्धतेनुसार गॅस दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर यांनी दिली.

गॅसच्या तुटवड्यामुळे काही दिवसांपासून गॅस दाहिन्यांच्या कार्यप्रणालीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिन्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने या दाहिन्या बंद झाल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे महापालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिन्या तसेच एपीसी प्रणालीवर आधारित यंत्रणा कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महापालिकेने संबंधित गॅस कंपन्यांशी संपर्क साधला होता. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला यासंदर्भात पत्र देण्यात आले असून सध्या महापालिकेला ४७.५ किलो वजनाचे दहा गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्धतेनुसार या सिलेंडरचा वापर करून गॅस दाहिन्या सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

गॅस उपलब्धतेत तात्पुरती अडचण निर्माण झाल्याने काही काळ गॅस दाहिन्या बंद ठेवण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, सिलेंडरचा पुरवठा सुरू झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवसांत गॅस पुरवठा नियमित राहिल्यास गॅस दाहिन्या सुरळीतपणे सुरू राहतील, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांनी या परिस्थितीबाबत घाबरून जाऊ नये, असे आवाहनही महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात आले आहे. गॅस दाहिन्यांव्यतिरिक्त विद्युत दाहिन्या आणि पारंपरिक लाकूड दाहिन्यांची व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच गॅसचा पुरवठा उपलब्धतेनुसार करण्यात येत असून नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

पुणे महापालिकेच्या गॅस विद्युत दाहिन्या सुरू ठेवण्यासाठी गॅस पुरवठादार कंपन्यांना पत्र दे या आले आहे. त्यानुसार गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरू नये – मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका