पुणे, ११ मार्च २०२६: पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील जुन्या सर्वसाधारण सभागृहाचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार असून या सभागृहाला आधुनिक आणि अत्याधुनिक स्वरूप देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत बैठक कक्ष उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २.२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या इस्टेट समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
महापालिकेच्या जुन्या इमारतीतील हे सभागृह पूर्वी सर्वसाधारण सभेसाठी वापरले जात होते. नव्या प्रशासकीय इमारतीत भव्य सर्वसाधारण सभागृह उभारल्यानंतर या जुन्या सभागृहाचा वापर प्रामुख्याने लहान कार्यक्रम, बैठक आणि विविध उपक्रमांसाठी केला जात होता. मात्र, वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे मोठ्या आणि सुसज्ज बैठक कक्षाची गरज भासत असल्याने या सभागृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नूतनीकरणानंतर या सभागृहात १३५ ते १५० व्यक्ती बसू शकतील अशी बैठक व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये मोठ्या आकाराचे यू-आकाराचे टेबल, आरामदायी खुर्च्या, प्रत्येक आसनासाठी मायक्रोफोन, प्रोजेक्टर स्क्रीन आणि अन्य डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बैठका अधिक परिणामकारक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने पार पाडता येणार आहेत.
जुन्या इमारतीतील या सभागृहाला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांची साक्षीदार असलेल्या या सभागृहाला नव्या स्वरूपात पुनरुज्जीवन देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर येथे महापालिकेच्या महत्त्वाच्या धोरणात्मक बैठका, प्रशासकीय चर्चा तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांचे आयोजन करण्यासही सुविधा उपलब्ध होणार आहे.

More Stories
Pune: बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ बाबत आढावा बैठक संपन्न
महाराष्ट्रात ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ लागू नागरीक सोशल फाउंडेशनची करण्याची मागणी
पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून : विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना आनंद घेता येणार