May 18, 2024

आयकर, क्रीडा प्रबोधिनी संघांचा सफाईदार विजय

पुणे २९ जून २०२३ – वरिष्ठ गटातून गुरुवारी झालेल्या सामन्यातून आयकर, पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी संघांनी आपला दर्जा सिद्ध करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात आयकर पुणे संघाने पीसीएमसी अकादमीचा ६-० असा धुव्वा उडवला.
उपांत्यपूर्व फेरीतील या पहिल्या सामन्यात आयकर संघाकडून भीम बाटला (११ आणि २६वे मिनिट) आणि रणजित कुल्लु (१३वे मिनिट) यांनी गोल करुन संघाला मध्यंतराला ३-० अशी आघाडी मिळवून दिली होती.  उत्तरार्धात नितीन नंदनदोरी (३१वे मिनिट) आणि तेजस चव्हाण (३४, ५५वे मिनिट) यांनी गोल करुन संघाची आघाडी वाढवली आणि याच आघाडीवर विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर झालेल्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने ११ गोलच्या झालेल्या सामन्यातही वर्चस्व राखताना रेल्वे लाईन बॉईज संघाचा ८-३ असा पराभव केला.
क्रीडा प्रबोधिनी संघाने ११व्या मिनिटाला खाते उघडले. मयुर धनवडेने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. त्यानंतर २५व्या मिनिटाला विनायक हांडेने पेनल्टी स्ट्रोक सत्कारणी लावला. दोनच मिनिटांनी सागर शिंदेने मैदानी गोल करून मध्यंतराला संघाला ३-० असे आघाडीवर नेले.
सामन्याचा उत्तरार्ध मात्र कमालीचा वेगवान झाला. या सत्रात ८ गोलची नोंद झाली. यामध्ये प्रथम रोहन मुसळेने रेल्वे बॉईजचा ३८व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र, त्यानंतर रेल्वे बॉईजनी चार गोल करून संघाची आघाडी ७-१ अशी भक्कम केली. सागरने ४० आणि ४४व्या, तर विनायकने ४२ आणि वेंकटेश केंचीने ४३व्या मिनिटाला गोल केला.
सामन्याच्या अखेरच्या तीन मिनिटांत तीन गोल झाले. यात रेल्वे बॉईजरकडून उदय बारामतीकरने ५५व्या, क्रीडा प्रबोधिनीच्या वेंकटेशने ५७व्या आणि रेल्वे बॉईजच्या अमोल भोसलेने ५८व्या मिनिटाला गोल केले. या वेगवान अखेरच्या सत्रातील खेळाने रेल्वे बॉईजला पिछाडी दोन गोलने भरून काढल्याचे समाधान मिळाले.
निकाल –
उपांत्यपूर्व फेरी १ – आयकर, पुणे ६ (भीम बाटला ११, २६वे मिनिट, रणजित कुल्लु १३वे (कॉर्नर), नितिन नंदनदोरी ३१वे मिनिट, तेजस चव्हाण ३४ आणि ५५वे मिनिट) वि.वि. पीसीएमसी अकादमी ०. मध्यंतर ३-०
उपांत्यपूर्व फेरी २ – क्रीडा प्रबोधिनी ८ (मयुर धनवडे ११वे मिनिट (कॉर्नर), विनायक हांडे २५वे मिनिट (पेनल्टी स्ट्रोक), ४२वे मिनिट, सागर शिंदे २७, ४०, ४४वे मिनिट, वेंकटेश केंची ४३, ५७वे मिनिट) वि.वि. रेल्वे लाईन बॉईज ३ (रोहन मुसळे ३८वे मिनिट, उदय बारामतीकर ५५वे मिनिट, अमोल भोसले ५८वे मिनिट (कॉर्नर)
आजचे सामने –
जीएसटी अॅण्ड कस्टम्स, पुणे वि. हॉकी लव्हर्स स्पोर्टस क्लब दु. १.३० वा.
कीडस इलेव्हन वि. मध्य रेल्वे, पुणे  दु. ३.३० वा.