February 24, 2024

एमपीएल व आगामी विश्वचषक स्पर्धेमुळे पुण्यातील क्रिकेट संस्कृतीत वाढ होणार – शरद पवार यांचे प्रतिपादन

पुणे, 29 जून 2023 : पुण्याच्या स्टेडियम वर वर्ल्डकप चे पाच सामने होणार आहेत ही पुणेकरांसाठी अभिमानची गोष्ट आहे. यामुळे नक्कीच पुण्यातील क्रिकेट संस्कृती वाढेल, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, एमसीए अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि एमपीएलचे अध्यक्ष सचिन मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय एमसीएमधील इतर पदाधिकारी सुहास पटवर्धन, सुनील मुथा, विनायक द्रविड, राजू काणे, अजिंक्य जोशी, राजवर्धन कदमबांडे, सुशील शेवाळे, रणजीत खिरिड, कल्पना तापिकर उपस्थित होत्या.

पवार म्हणाले, एमसीएच्या वतीने महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजित केली आहे. या लीगमुळे अनेक चांगले खेळाडू भविष्यात महाराष्ट्राला मिळतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी उदय सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले. 

 
यावेळी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए)ला मिळाल्याबद्दल बीसीसीआय सचिव जय शहा यांचे आभार मानले. तसेच एमपीएलला सर्व सामन्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. तसेच, ग्राउंड्समन व मैदानावरील सर्व कर्मचारी यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन मैदान स्पर्धेसाठी सुयोग्य परिस्थितीत ठेवले यासाठी रोहित पवारांनी त्यांचे विशेष आभार मानले. 
  
याप्रसंगी केरळ संस्कृतीचे वैशिष्ट्य चेंडा मेलम वादन, नादब्रम्ह ढोल ट्रस्टचे ढोलवादन, अभंग रीपोस्ट यांनी सादरीकरण केले.