July 27, 2024

पुण्यात होणार भारत – जपान शैक्षणिक परिषदेचे आयोजन

पुणे, दि. १७ नोव्हेंबर, २०२३ : मुंबई मधील कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान आणि इंडो जपान बिझिनेस काउंसिल (आयजेबीसी) आणि यांच्या वतीने पुण्यात येत्या शुक्रवार, दि २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी भारत जपान शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद सकाळी ९.३० ते सायं ४ दरम्यान कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न होणार आहे. नवी दिल्ली येथील जपान फाउंडेशन आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ (एमआयटी- डब्लूपीयु) यांचे विशेष सहकार्य परिषदेसाठी लाभले आहे.

ही शैक्षणिक परिषद विद्यार्थी, पालक, शिक्षक, संशोधक यांसाठी विनामूल्य खुली असून त्यासाठी आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांना www.educon.ijbc.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे

तोशिहीरो कनेको, डेप्युटी चीफ – मिशन्स, कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या हस्ते सदर परिषदेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर त्यांचे बीजभाषण देखील होईल. एमआयटी गृप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.

सदर परिषदेसंदर्भांत अधिक माहिती देताना आयजीबीसीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख म्हणाले, “भारतीय विद्यार्थ्यांना जपानमधील शिक्षण क्षेत्रातील संधी ओळखण्यास मदत व्हावी या उद्देशाने हे व्यासपीठ तयार करण्यात आले असून या शैक्षणिक परिषदेत भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांना जपानमधील संधींची माहिती मिळू शकणार आहे. मागील परिषदेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या शैक्षणिक परिषदेच्या या दुसरी आवृत्तीचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.”

भारतीय आणि जपानी विद्यापिठांमधील शैक्षणिक संबंध वाढविणे, स्टुडंट एक्स्चेंज अर्थात विद्यार्थी देवाणघेवाण उपक्रम अधिक सुलभ करणे, संशोधन आणि विकासासाठी एकमेकांना मदत करणे याबरोबरच आणि ह्युमॅनिटीज (मानव्यविद्या), कला, संस्कृती, अर्थशास्त्र, व्यवस्थापन क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान आदी विषयांमधील शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हे या परिषदेचे उद्देश आहेत. टोकियो विद्यापीठ, आशिया पॅसिफिक विद्यापीठ (एपीयू), जपान आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (आययूजे), कान्साई विद्यापीठ, शिमाने विद्यापीठ अशी जपानमधील सर्वोत्तम विद्यापीठे या परिषदेत सहभागी व्हावीत, यासाठी आयजेबीसीच्या उच्च शिक्षण आणि संशोधन समितीने विशेष प्रयत्न केले आहेत, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना जपानमध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या संधींची विस्तृत माहिती या परिषदेद्वारे मिळणार आहे, यामुळे सदर परिषदेचे यजमानपद भूषवताना आम्हास विशेष आनंद होत आहे, असे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर एम चिटणीस यांनी सांगितले. या परिषदेच्या निमित्ताने जपानमधील शैक्षणिक संधी यासंबंधीच्या एका विशेष सहायता केंद्राचे उद्घाटन एमआयटी, कोथरूडच्या कँपसमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. चिटणीस यांनी दिली.

जपानमधील शिक्षण आणि करिअर, विविध स्तरावरील भारत-जपान भागीदारीची गतिशीलता, तेथील संशोधन आणि शिष्यवृत्ती यांच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, अभियांत्रिकी संशोधनात भारत जपान सहयोग आदी विषयांवर या परिषदेदरम्यान आयआयटी दिल्ली, क्योटो विद्यापीठ, क्युशू विद्यापीठ, जेएनयू आदी प्रतिथयश शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आपले विचार मांडतील व काही महत्वाच्या केस स्टडीजची माहिती देखील देतील.