July 27, 2024

येत्या २५ नोव्हेंबर रोजी ‘चित्रस्वर’चे आयोजन

पुणे दि. १८ नोव्हेंबर, २०२३ : पुण्यातील ‘प्रेरणा म्युझिक’ ऑर्गनायझेशनच्या वतीने आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने येत्या शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी ‘चित्रस्वर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृह येथे सायं ५ वाजता सदर कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. 

‘चित्रस्वर’ या कार्यक्रमात मराठी व हिंदी चित्रपटांमधील बंदिशी, चित्रपट गीते, ठुमरी, दादरे यांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी जयपूर अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू व किराणा घराण्याचे आश्वासक युवा गायक विराज जोशी यांचे गायन होईल. पं हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य व प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांचे बासरीवादन हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य असेल.

या आधी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध बासरीवादक पं मिलिंद दाते यांचे शिष्य अनुराग जोशी यांचे एकल बासरीवादन होईल तर ग्वाल्हेर घराण्याचे मुंबईमधील सुप्रसिद्ध गायक पं अमरेंद्र धनेश्वर यांच्या उपशास्त्रीय संगीत मैफलीने कार्यक्रमाचा समारोप होईल.

कार्यक्रमासाठी प्रसाद जोशी व अभिजीत बारटक्के (तबला), ऋतुराज कोरे (रिदम), मिहिर भडकमकर (कीबोर्ड), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) हे साथसंगत करतील.