पुणे, 11 फेब्रुवारी 2023 – महाराष्ट्राने फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. ही सुरुवात असली, तरी भविष्यात महाराष्ट्रही या खेळात पुढे येऊ शकतो. फुटबॉलचा विकास आणि खेळाडू निर्मिती याकडे महाराष्ट्राने लक्ष दिले आहे. यातही कोल्हापूरने आम्हाला प्रभावित केले आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी सांगितले.
एका खासगी कामासाठी चौबे पुण्यात आले होते. तेव्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. फुटबॉलपटू म्हणून खेळत असतानाही आम्हाला कोल्हापूरचे आकर्षण होते. एका सामन्यासाठी तेथे आलो असताना एकही महाराष्ट्राचा खेळाडू खेळत नसताना तेथे झालेली गर्दी पाहून आम्ही प्रेरित झालो होतो, अशी आठवण सांगून चौबे यांनी भविष्यात आम्ही कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्याचा निश्चित विचार करू असे आश्वासन दिले.
खेळाचा आणि खेळाडूचा विकास याला आमचे प्राधान्य असून, आमच्या फुटबॉल विकास कामात यालाच महत्व दिले आहे. अध्यक्ष झाल्यानंतर विविध राज्यांना भेट देत असताना नॉर्थ ईस्टकडील राज्यातील खेळाडूंचा खेळ पाहून चकित झालो. त्यांची आक्रमकता, त्यांच्या खेळातील वेग हा कमालीचा होता. केवळ टिव्हीवर सामना पाहून हे खेळाडू इतकी प्रगती करू शकत असतील, तर यांना अचूक मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्या तर हे खेळाडू अधिक प्रगती करू शकतील असे सांगताना चौबे यांनी याचा एक भाग म्हणून आम्ही मैत्रीपूर्ण तिरंगी सामन्यांचे आयोजन करण्याची पहिली संधी मणिपूरला दिल्याचे सांगितले.
या भेटीत चौबे यांनी फुटबॉल मैदानाच्या विकास आणि निर्मितीलाही प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले. फुटबॉल वाढवण्यासाठी ते अधिक खेळला गेला पाहिजे आणि त्यासाठी मैदाने आवश्यक आहेत. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धा ज्या देशात होतात, तेथे अशा पायाभूत सुविधा उभ्या राहतात. त्यामुळे आम्ही फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने भारतात कसे होतील याकडे लक्ष देत आहोत. आम्ही यासाठी आशियाई स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून या स्पर्धेच्या निमित्ताने आंतररराष्ट्रीय दर्जाची मैदाने उभी राहतील. मैदाने तयार झाली की त्याचा वापर कसा करता येईल यासाठी नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
देशातील बंद पडलेल्या विविध स्पर्धांचे पुनरुज्जीवन करण्याचाही आमचा विचार असून, त्यादृष्टिने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन