पुणे, ३ जून २०२५: हवामानातील बदल आणि त्यातून उद्भवणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतीत तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. त्यामुळे पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये सादर झालेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं इन्क्युबेशन करून त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कृषी महाविद्यालय येथील सिंचन नगर मैदानावर पार पडलेल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय आयुक्त कविता द्विवेदी आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “शेतीचा खर्च वाढतोय, मनुष्यबळ कमी होतेय आणि अशा वेळी जलसिंचन, ड्रायर्स, एआय कंन्ट्रोल रोव्हर्स, कीड व्यवस्थापनासाठी मशीन लर्निंग, पीक काढणी प्रक्रिया अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा शेतीसाठी उपयुक्त ठरेल. कृषी विभागाने पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रे स्थापन करावीत आणि या तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादन करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.”
क्लिन प्लांट उपक्रमात महाराष्ट्र आघाडीवर-
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, “देशात ‘क्लिन प्लांट’ उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी ९ प्रगत केंद्रे उभारण्यात येतील. त्यातील ३ केंद्रे महाराष्ट्रात – पुणे (द्राक्ष), नागपूर (संत्री) आणि सोलापूर (डाळिंब) येथे उभारण्यात येतील. ३०० कोटींच्या या योजनेतून दरवर्षी ८ कोटी रोगमुक्त रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील.”
या केंद्रांत आधुनिक रोपवाटिका निर्माण होणार असून त्या चालवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. मोठ्या रोपवाटिकेसाठी ३ कोटी आणि मध्यम रोपवाटिकेसाठी दीड कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेतीतील उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि नैसर्गिक आपत्तीतून संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशभरातील १६ हजार कृषी वैज्ञानिक आणि शेतकरी यांचा समन्वय साधला गेला तर कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडू शकेल, असेही चौहान यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांकडून तंत्रज्ञान प्रसारावर भर-
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “निसर्गाचा असमतोल, कमी मनुष्यबळ, वाढता खर्च, पाण्याची टंचाई या आव्हानांपुढे शेतकरी उभा आहे. म्हणून कमी वेळेत अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शासन, कृषी विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे कार्य करावे.”
पुणे हे शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असण्याबरोबर कृषी क्षेत्रालाही दिशा देणारे केंद्र आहे. येथील संशोधक, नवोद्योजक शेतकरी राज्याच्या कृषी प्रगतीत मोलाची भर घालतात. पुणे ॲग्री हॅकॅथॉन हा कृषी क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असून यापुढे अधिकाधिक स्पर्धकांना संधी देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही पवार यांनी नमूद केले.
हॅकॅथॉनचा प्रभाव-
या हॅकॅथॉनसाठी साडेपाचशे स्पर्धकांनी अर्ज केला होता. त्यापैकी सव्वाशे स्पर्धकांना प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी देण्यात आली. कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर नवकल्पना आणि तंत्रज्ञान यांच्यामार्फत उपाय सुचविणाऱ्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमात कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, स्टार्टअप्स, कृषी क्षेत्रातील तज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
Pune: महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा