पुणे, दि. 07/03/2026 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
पीएमआरडीएकडून उभारण्यात आलेल्या या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

More Stories
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या
महापालिकेची मालमत्ता पुढाऱ्यांची जहागीरीसाठी २६ वर्षे जुना निर्णय रद्द