July 27, 2024

क्रीडा प्रबोधिनी, जीएसटी अॅण्ड कस्टम्स अंतिम फेरीत

पुणे १ जुलै २०२३ – रंगतदार झालेल्या लढतीत जीएसटी अॅण्ड कस्टम्स संघाने शूट-आऊटमध्ये विजय मिळवूनयेथे सुरु असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी त्यांची गाठ क्रीडा प्रबोधिनी संघाशी पडणार आहे.

नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शनिवारी जीएसटी अॅण्ड कस्टम्स संघाने नियोजित वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूट-आऊटमध्ये मध्य रेल्वे संघाचा ५-४ असा पराभव केला.

सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला गोविंद नागने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून मध्य रेल्वे संघाला आघाडीवर नेले होते. त्यानंतर १६व्या मिनिटाला अनिकेत गुरवने गोल करून जीएसटी-कस्ट्म्स संघाला बरोबरी राखून दिली. यानंतरही पूर्वार्धात नागनेच २५व्या मिनिटाला आणखी एक कॉर्नरय़चे गोलात रुपांतर करून मध्य रेल्वेला आघाडीवर नेले. तीनच मिनिटांनी आदित्य रसाळने गोल करून मध्यंतराला मध्य रेल्वेची भाजी ३-१ अशी भक्कम केली होती.

उत्तरार्धात मात्र जीएसटी-कस्ट्म्स संघाने कमालीचा वेगवान खेळ करताना सामना बरोबरीत सोडवला. यात धरमवीर यादवने ३४ आणि ४६व्या मिनिटाला गोल केले. शूट आऊट मध्ये जीएसटी-कस्ट्म्सच्या पाचही खेळाडूंनी आपले लक्ष्य अचूक साधले. तालेब शाह, धरमवीर यादव, अनिकेत गुरव. कुणाल धमाळ आणि हरिष शिंगदी यांनी गोल केले. मध्य रेल्वेकडून आदित्य रसाळचा पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे नंतर विनीत कांबळे, गोविंद नाग, स्टिफन स्वामी, गणेश पाटिल यांनी गोल करूनही मध्य रेल्वेला पराभव पत्करावा लागला.

त्यापूर्वी क्रीडा प्रबोधिनी संघाने सागर शिंगाडेच्या पूर्वार्धातील एकमेव गोलच्या आधारावर इन्कमटॅक्स (आयकर) संघाचा १-० असा पराभव केला.

निकाल –

उपांत्य फेरीत १ – क्रीडा प्रबोधिनी १ (सागर शिंगाडे २२वे मिनिट, कॉर्नर) वि.वि. इन्मकटॅक्स, पुणे ०. मध्यंतर १-०

उपांत्य फेरी २ – जीएसटी-कस्टम्स, पुणे ३ (५) (अनिकेत गुरवा १६वे मिनिट, धरमवीर यादव ३४वे मिनिट, (कॉर्नर), ४६वे मिनिट,, ताबेल शाह, धरमवीर यादव, अनिकेत गुरव, कुणाल ढमाळ, हरिष शिंगडी) वि.वि. मध्य रेल्वे, पुणे ३(४) (गोविंद नाग ५ आणि २५वे मिनिट (कॉर्नर), आदित्य रसाळ २८वे मिनिट, विनित कांबळे, गोविंद नाग, स्टिफन स्वामी, गणेश पाटिल) मध्यंतर १-३.