पुणे २ जुलै २०२३ – आक्रमक आणि वेगवान खेळाचा सुरेख समन्वय साधून क्रीडा प्रबोधिनी संघाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनीने पुण्याच्या जीएसटी आणि कस्टम्स संघाचा ४-२ असा पराभव केला.
नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात सुरुवातीलाच पिछाडीवर राहिल्यानंतरही क्रीडा प्रबोधिनीने उत्तरार्धातील आक्रमक खेळाच्या जोरावर विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे सामना मध्यंतराला १-१ असा बरोबरीत राहिला होता.
सामन्याच्या चौथ्यात मिनिटाला अनिकेत गुरवने गोल करून जीएसटी संघाला आघाडीवर नेले होते. मात्र, चारच मिनिटांनी मयुर धनवडेने कॉर्नरवर क्रीडा प्रबोधिनीला बरोबरी साधून दिली. या सुरुवातीच्या धडाक्यानंतरही सामना विश्रांतीला १-१ असा बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात खेळायला सुरुवात झाल्यावर सागर शिंगाडेने ३५व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका कॉर्नरवर गोल करून क्रीडा प्रबोधिनी संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दोन मिनिटांच्या अंतराने आणखी दोन गोल करून क्रीडा प्रबोधिनीने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळविले. प्रथम वेंकटेश केंचीने ४५व्या आणि पाठोपाठ सचिन राजगडेने ४६व्या मिनिटाला गोल केले. सामन्यात निर्णायक क्षणी ४-१ असे मागे पडल्यानंतर जीएसटी-कस्ट्म्स संघाला सरतेशेवटी पिछाडी एका गोलने कमी करण्याचेच समाधान लाभले. सामन्याच्या ५३व्या मिनिटाला हरिष शिंगडीने हा गोल केला.
दरम्यान, इन्कम टॅक्स संघाने मध्य रेल्वे, पुणे संघाचा ३-२ असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले. इन्कमटॅक्ससाठी चिराग मानेने खाते उघडले. त्यानंतर मध्य रेल्वेसाठी गोविंद नाग आणि गणेश पाटिल यांनी गोल करून संघाला आघाडीवर नेले. या वेळी तेजस चव्हाण आणि अथर्व कांबळे यांनी अनुक्रमे २९ आणि ३१व्या मिनिटाला गोल करून इन्कमटॅक्स संघाला आघाडीवर नेले.
विजेतेपदासाठी क्रीडा प्रबोधिनी संघाला रोख २० हजार, तर उपविजेत्या जीएसटी-कस्टम्स संघाला रोख १० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. इन्कमटॅक्स संघाला पाच हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिद्धार्थ झाल्टे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी महेंद्र निकाळजे, नितिन निकाळजे, सुनील रणपिसे, आनंद छाजेड, अनिल जगताप, लिनो जॉन, जयकुमार मुथय्या आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – दिपेश चौबे (जीएसटी-कस्टम्स,पुणे)
बचावपटू – राहुल संदेर (इन्कमटॅक्स, पुणे),
फॉरवर्ड – वेंकटेश केंटी (क्रीडा प्रबोधिनी)
स्पर्धेचा मानकरी – तालेब शाह (जीएसटी-कस्टम्स, पुणे)
निकाल –
क्रीडा प्रबोधिनी ४ (मयुर धवनडे ८ वे मिनिट (कॉर्नर), सागर शिंगाडे ३५वे मिनिट (कॉर्नर), वेंकटेश केंटी ४५वे मिनिट, सचिन राजगाडे ४६वे मिनिट) वि.वि. जीएसटी-कस्टम्स,पुणे २ (अनिकेत गुरव ४थे मिनिट, हरिष शिंगडी ५३वे मिनिट) मध्यंतरा १-१
तिसरा क्रमांक – इन्कमटॅक,पुणे ३ (चिराग माने १४वे मिनिट, तेजस चव्हाण २९वे मिनिट, अथर्व कांबळे ३१वे मिनिट) वि.वि. मध्य रेल्वे,पुणे २ (गोविंद नाग १५वे मिनिट, गणेश पाटिल १९वे मिनिट कॉर्नर) मध्यंतर २-२
More Stories
डेकॅथलॉनच्या १० कि. शर्यतीचे २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजन
दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत इम्पेरियल स्वान्स, साइनुमेरो जालन गोशॉक, ऑप्टिमा फाल्कन्स संघांची विजयी सुरुवात
चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून