July 27, 2024

एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत लक्ष्य त्रिपाठी, जान्हवी सावंत यांना विजेतेपद

पुणे, 9 फेब्रुवारी 2024: इंटेंसिटी  टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात बेंगळूरुच्या लक्ष्य त्रिपाठी याने, तर मुलींच्या गटात पुण्याच्या जान्हवी सावंत यांनी विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत नक्षत्रा अय्यर व वैदेही शुक्ला यांना, तर यशवंतराजे पवार व कबीर गुंडेचा यांनी विजेतेपद पटकावले.
 
खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी  टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये मुलींच्या गटात अंतिम लढतीत पाचव्या मानांकित पुण्याच्या जान्हवी सावंतने अव्वल मानांकित मध्यप्रदेशच्या वैदेही शुक्लाचा 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 1तास 20मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये जान्हवी हीने सुरेख सुरुवात करत तिसऱ्या गेममध्ये वैदेहीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये जान्हवीने वैदेहीला फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये तिने तिसऱ्या गेममध्ये वैदेहीची सर्व्हिस रोखली व हा 6-2 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. जान्हवी ही परांजपे विद्या मंदिर शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून सोलारिस क्लब येथे प्रशिक्षक रवींद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 
 
मुलांच्या गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित बेंगळूरच्या लक्ष्य त्रिपाठीने तिसऱ्या मानांकित सोलापूरच्या यशवंतराजे पवारचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. लक्ष्य हा क्रिस मार्कीज टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक क्रिस मार्की, वडील आशिष त्रिपाठी, मोहित मयुर जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
 
दुहेरीत अंतिम लढतीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित नक्षत्रा अय्यर व वैदेही शुक्ला या जोडीने तिसऱ्या मानांकित जान्हवी सावंत व अस्मी पित्रे यांचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात अव्वल मानांकित यशवंतराजे पवार व कबीर गुंडेचा यांनी तिसऱ्या मानांकित अद्वैत गुंड व अर्णव पांडे यांचा 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कपिला रिसॉर्टचे संचालक प्रणय ढोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अतुल देवधरे, कपिल किन्नरी, शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशनच्या सारिका गडदे, सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
निकाल: अंतिम फेरी: मुले:
लक्ष्य त्रिपाठी(7)वि.वि. यशवंतराजे पवार(3)6-3, 1-6, 6-3;
 
मुली: जान्हवी सावंत(5)वि.वि.वैदेही शुक्ला(1)6-4, 6-2;
 
दुहेरी: मुली: अंतिम फेरी: 
नक्षत्रा अय्यर/वैदेही शुक्ला(1) वि.वि.जान्हवी सावंत/अस्मी पित्रे(3)6-3, 6-2;
 
मुले: यशवंतराजे पवार/कबीर गुंडेचा(1) वि.वि.अद्वैत गुंड/अर्णव पांडे (3)6-3, 6-3.