July 27, 2024

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत श्रुती कोतवाल हिला दुहेरी मुकुट

पुणे, १० फेब्रुवारी २०२४: पुण्याच्या श्रुती कोतवाल हिने खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेतील पाचशे मीटर व एक हजार मीटर ट्रॅक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट पटकाविला. ही स्पर्धा लेहमधील गुपुक तलाव परिसरात सुरू आहे.‌
श्रुती ही देशातील पहिली व्यावसायिक आणि सर्वात वेगवान महिला आईस स्पीड स्केटर मानली जाते. दोन्ही शर्यतींमध्ये तिच्यापुढे स्थानिक खेळाडूंचे मोठे आव्हान होते. तथापि तिने अतिशय नियोजनबद्ध कौशल्य व आत्मविश्वास दाखवीत सुवर्णपदक खेचून आणले. लडाखमधील खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये भारतातील अव्वल स्केटर्सचा समावेश होता या खेळाडूंपैकी काही खेळाडू परदेशात प्रशिक्षण घेतात आणि स्पर्धांमध्ये भाग येत असतात.
चीनमध्ये सन २०२५ आयोजित केल्या जाणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये श्रुती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. श्रुतीने २००८ च्या गुलमर्ग (जम्मू आणि काश्मीर) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.  गेल्या दशकात तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२४ ही १५ वर्षांनंतरची तिची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आहे.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये हिवाळी क्रीडा प्रकारांचा समावेश केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून तिने सांगितले,” या स्पर्धेमुळे आम्हा क्रीडापटूंना राष्ट्रीय भूमीवर आमची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली आहे आणि मला आशा आहे की आम्हाला पाहिल्याने पुढील पिढीला स्पीड स्केटिंग करण्याची प्रेरणा मिळेल. ”