February 27, 2024

लाईटस..अॅक्शन..ले पंगा प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाला भव्य क्रूझवर प्रारंभ

अहमदाबाद १ डिसेंबर २०२३ – कबड्डी आणि भारतातील लोकांमध्ये अनेक वर्षांपासूनचे घट्ट नाते आहे. या प्रवासात २०१४ मद्ये प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली आणि हे नाते आणखी दृढ झाले. मशाल स्पोर्ट्सच्या संस्थापकांनी या लीगच्या माध्यमातून ३० सेकंदाची चढाई, करा किंवा मरा (डू ऑर डाय), अव्वल चढाई (सुपर रेड), अव्वल पकड (सुपर टॅकल) असे नाविन्यपूर्ण नियम आणून कबड्डी खेळाला अधिक आकर्षक केले. त्याला थेट प्रसारणाच्या माध्यमातून लाखो चाहतेही मिळाले.
आता ही लीग १०वे पर्व पूर्ण करत आहे. या पर्वाची सुरुवातही आगळी झाली. अहमदाबादमधील अक्षर नदीवरील एका क्रूझवर खास शैलीत या पर्वाच्या नाट्यावरील पडदा उघडला. मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख आणि प्रो-कबड्डी लीगचे प्रवर्तक अनुपम गोस्वामी यांनी ९व्या पर्वाचा विजेता कर्णधार सुनील कुमार (जयपूर पिंक पॅंथर्स) आणि या १०व्या पर्वातील उदघाटनाच्या सामन्याचे कर्णधार पवन सेहरावत (तेलुगु टायटन्स) आणि फझल अत्राचेली (गुजरात टायटन्स) यांच्या साथीत या पर्वाची सुरुवात केली.
क्रूझ अक्षर नदीच्या पाण्यावरून पुढे जात असताना सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अनुपम गोस्वामी म्हणाले, ‘या नव्या १०व्या पर्वापासून लीग पुन्हा एकदा सर्व १२ शहरातून पार पडणार आहे हा सर्वात महत्वाचा क्षण आहे. आम्ही किमान नऊ भौगोलिक क्षेत्रात पुन्हा या निमित्ताने सक्रिय होणार आहोत. त्यामुळे २०१९ पासून ज्या शहरांना प्रो-कबड्डी लीगचा अनुभव घेता आला नाही, त्या शहरात सर्वप्रथम पोचणार आहोत. आता १२ शहरांमध्ये लीगचे आयोजन होत असल्यामुळे प्रत्येक घरच्या चाहत्यांना लीगशी जोडता येणार आहे.’
प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाला शनिवारी ईकेअे अरेना येथे गुजरात जाएंटस विरुद्ध तेलुगु टायटन्स, या लढतीने सुरुवात होणार आहे. टायटन्सचा कर्णधार आणि लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पवन सेहरावत म्हणाला, नव्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गेल्या हंगामाला दुखापतीमुळे मुकणे माझ्यासाठी कठिण होते. या नव्या हंगामासाठी भरपूर ऊर्जा साठवली आहे. पहिल्या सामन्यात फझलचे आव्हान पेलण्यासाठी मी उत्सुक आहे. सरानव शिबिराच्या माध्यमातून आमचा सराव चांगला झाला आहे. जाएंटसविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आम्ही पूर्ण तयार आहोत.
दरम्यान, लीगमधील सर्वात महागडा बचावपटू आणि जाएंटसचा कर्णधार फझल अत्राचेली म्हणाला, लीगच्या १०व्या पर्वाचाही भाग व्हायला मिळाले हे माझे भाग्य आहे. या पर्वात खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. ही कबड्डी विश्वातील सर्वोत्तम मोठी स्पर्धा आहे. आम्ही आता कधी एकदा मैदानावर उतरतोय, असे झाले आहे. आमच्याकडे भरपूर तरुण प्रतिभा आणि चांगला प्रशिक्षक आहे. मी चांगल्या सुरुवातीची वाट पहात आहे.
जयपूर पिंक पॅंथर्सने नवव्या पर्वा अंतिम फेरीत पुणेरी पलटण संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. जयपूर पिंक पॅंथर्सचा कर्णधारक सुनील कुमार म्हणाला, या क्षणी तरी विजेतेपद आमच्याकडे आहे. ती आमच्याकडे राहिल यासाठी आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. कठोर मेहनतीसह या नव्या पर्वासाठी आम्ही तयार आहोत. गेल्या वर्षी आम्ही खेळाडूंमध्ये चांगले नियोजन आणि खेळाचे व्यवस्थापन केले होते. या वर्षी देखिल अशाच पद्धतीने आम्ही करु. तयारी तर चांगली झाली आहे.
अहमदाबाद येथील पहिला टप्पा २ ते ७ डिसेंबर असा चाल णार आहे. त्यानंतर बंगळुर (८ ते १३ डिसेंबर), पुणे (१५ ते २० डिसेंबर), चेन्नई (२२ ते २७ डिसेंबर), नोएडा (२९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४), मुंबई (५ ते १० जानेवारी २०२४), पाटणा (२६ ते ३१ जानेवारी), दिल्ली (२ ते ७ फेब्रुवारी), कोलकता (९ ते १४ फेब्रुवारी) आणि पंचकुला (१६ ते २१ फेब्रुवारी) असे टप्पे पार पडणार आहेत.
नेहमीप्रमामे या १०व्या हंगामातील सामन्याचेही थेट प्रसारणा स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने-हॉटस्टार वरून करण्यात येणार आहे.