September 17, 2024

पुणे परिमंडलामध्ये पालखी सोहळ्यांसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज

पुणे, दि. ९ जून २०२३: जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यांसाठी महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरूस्तीचे कामे करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागांच्या कार्यक्षेत्रात २४ तास कार्यरत राहणार्‍या ३० अभियंता व १३५ कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यासह मागणीप्रमाणे तात्पुरती वीज जोडणी देखील तात्काळ उपलब्ध होणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्त पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, रास्तापेठ, राजगुरुनगर व मुळशी विभागांच्या कार्यक्षेत्रात जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा रविवारी (दि. ११) ते बुधवार (दि. १४) पर्यंत होणार आहे. या विभागांमध्ये विविध ठिकाणच्या पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात रोहित्रे व इतर साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. वीज सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी मोबाईल ट्रॉन्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून पिण्याचे पाणी, फळ, अल्पोपाहार आदींची सेवा देण्यात येणार आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत संपूर्ण पालखी सोहळा मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी व परिसरातील वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. उपरी वीजवाहिन्या भूमिगत करणे, अर्थिंग, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची तसेच रोहित्रांसह कुंपणाची देखभाल व दुरुस्तीची कामे, फिडर पिलर्सची दुरुस्ती, डिस्क इन्सूलेटर बदलणे, झोल पडलेल्या तारा ओढणे, तारांना स्पेसर्स लावणे, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले वीजखांब बदलणे आदी कामे करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या कालावधीत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता विविध भेटी देणार आहेत.

पालखी मार्गावर किंवा मुक्कामाच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे तसेच उन्हाळा देखील तापलेला आहे. त्यामुळे वीजखांब, फिडर पिलर, डीपी बॉक्स किंवा अन्य ठिकाणच्या वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी पुणे परिमंडल अंतर्गत अभियंता व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून ते २४x७ वीज सेवा देणार आहेत. वीजविषयक कोणतीही तक्रार असल्यास २४ तास सुरु असलेल्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– पालखी सोहळ्याच्या कालावधीत अभियंता व कर्मचाऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्यासह भाविकांच्या वीजसुरक्षेबाबत संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल. वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. तसेच भाविकांनी किंवा स्वयंसेवकांनी वीज सेवेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित अभियंता/ कर्मचारी किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येईल.