पुणे, 22 मे 2023: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने पुण्यात लवकरच सुरू होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे 100 अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटुंचा सहभाग असणार आहे. हि स्पर्धा 15 जुन 2023 पासून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील अत्याधुनिक स्टेडियमवर रंगणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहीत पवार यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) यांच्या मान्यतेने आणि आयपीएल स्पर्धेच्या वैभवशाली धर्तीवर पुरुषांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) टी -20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यावेळी एमसीएचे उपाध्यक्ष किरण सामंत, एमसीएचे मानद सचिव शुभेंद्र भांडारकर, एमसीएचे खजिनदार संजय बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या पहिल्या वर्षी सहा संघ सहभागी होणार असल्याचे सांगून रोहीत पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर आपली गुणवत्ता दाखवून देण्याची संधी मिळावी आणि त्यामूळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख व प्रसिध्दी मिळावी हाच या स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश आहे.
या स्पर्धेला संपूर्ण भारतभरात अधिकाधिक प्रेक्षक वर्ग लाभावा याकरीता डीडी स्पोर्टस आणि अन्य ओटीटी चॅनल्स वरून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
येत्या 5 जून रोजी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेतून स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार असुन या संघ निवडीसाठी पुणे, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, सांगली सातारा, अहमदनगर, बीड, धुळे बुलढाणा, रत्नागिरी सिंधदुर्ग, रायगड व सोलापूर येथील 200 हून अधिक खेळाडूंनी आपली नावे नोंदविल्याची महिती रोहीत पवार यांनी दिली.
विविध संघांचे मालक बंद निविदा पद्धतीच्या माध्यमातून संघ खरेदी करू शकत असतील तर अत्यंत पारदर्शक अशा प्रक्रियेतून खेळाडू व संघांची निवड करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.
तसेच, गुप्तता व पारदर्शकता राखण्यासाठी संघाची निवड बंद निविदा पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी संघ मालकांना केले. तसेच, या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन स्पर्धेची एका संघाची मालकी स्वीकारावी आणि क्रिडा क्षेत्रातील एक मोठी संधी साधावी असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील बड्या कॉर्पोरेट, औद्योगिक व व्यावसायिक संस्थांना केले.
More Stories
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत
औरंगजेबाची कबर हटवयन्याची विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी ः अनयथा राज्यव्यापी ‘क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव’ आंदोलनचा इशारा