May 18, 2024

महावितरण व ‘सीओईपी’ विद्यापीठामध्ये ‘नॉलेज शेअरींग’चा सामंजस्य करार

पुणे, दि. ०६ सप्टेंबर २०२३: अभियांत्रिकी शिक्षणाला व्यावहारिक ज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड देण्यासाठी महावितरण व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये ‘नॉलेज शेअरींग’चा नुकताच सामंजस्य करार झाला. यावेळी कुलगुरू डॉ. सुधीर आगाशे आणि मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, ज्ञानाचे आदान प्रदान, वीजसुरक्षा व महावितरणच्या विविध डिजिटल ग्राहकसेवा आदींबाबत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून ‘नॉलेज शेअरींग’ करण्यात येणार आहे. याआधी गेल्या ऑगस्टमध्ये महावितरण व जिल्ह्यातील ३२ अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर आता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठासोबत सामंजस्य करार झाला आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात कुलगुरू डॉ. सुधीर आगाशे व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यामध्ये वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, संकल्पना व विविध प्रकल्पांबाबत चर्चा झाली. यावेळी रजिस्ट्रार डॉ. दयाराम सोनवणे, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांची उपस्थिती होती.