September 17, 2024

शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

पुणे, 03 मार्च 2023 : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने निर्गमित केले आहेत.

यापूर्वी मागविण्यात आलेल्या सूचना व हरकतींचा विचार करुन शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत केदारनाथ मंदीराच्या संरक्षणभिंतीच्या उत्तरेकडील दरवाजा येथे ५० मीटर परिसर नो-पार्किंग करण्याबाबतचे अंतिम आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोविंद खरे चौक ते रमणबाग चौक दरम्यान पी-०१, पी-०२ पार्किंग तसेच भिडे पूल ते झेड पूल जंक्शन दरम्यान नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोगटे प्रशाला चौक ते सत्यभामा सोसायटी लगतच्या रोडला १५ मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे १५ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असेही कळवण्यात आले आहे.