October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पंडित विनायक तोरवी अमृत महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. ३० ऑगस्ट, २०२३ : बंगळूरू स्थित गुरुराव देशपांडे संगीत सभा व पुण्यातील अल्फा इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने व किशोर पंप्स यांच्या सहकार्याने पंडित विनायक तोरवी अमृत महोत्सवाला सुरुवात होत आहे. सदर अमृत महोत्सवात पुढील वर्षभर देशातील विविध शहरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील पहिला कार्यक्रम रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता मयूर कॉलनी कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तो दिला जाईल.

सदर कार्यक्रमात सुरुवातीला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कस्तुरी दातार अत्रवलकर यांचे गायन होईल. त्यांना तबल्याची साथ अरुण गवई करतील तर संवादिनीवर लीलाधर चक्रदेव असतील.  त्यानंतर ज्येष्ठ तबला वादक पंडीत योगेश समसी यांचे एकल तबलावादन होईल. त्यांना मिलिंद कुलकर्णी संवादिनी वर साथ करतील.

कार्यक्रमात पंडित विनायक तोरवी यांचा रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष पूज्य स्वामी श्रीकांतानंदजी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येईल. यावेळी प्रसिद्ध कलाकार सुयोग कुंडलकर व पंडित तोरवी यांच्या शिष्या श्रुती भट प्रातिनिधिक स्वरूपात तोरवी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करतील. नीरजा आपटे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.