May 20, 2024

५५व्या बाबुकाका शिरगांवकर मेमोरियल खुल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण ३००खेळाडू झुंजणार

पुणे, १० मे २०२४: नुतन बुद्धिबळ मंडळ, सांगली यांच्या तर्फे आयोजित ५५व्या बाबुकाका शिरगांवकर मेमोरियल खुल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून ३०० खेळाडूंमध्ये १७३ मानांकित खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा गुलमोहर हॉल, अभिरुची मॉल, पुणे येथे १२ मे २०२४ रोजी रंगणार आहे.

नूतन बुध्दिबळ मंडळाचे उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर यांनी सांगितले कि, हि स्पर्धा जेकेज एक्सलंस चेस अकादमी यांच्या सहकार्याने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना(एआयसीएफ) आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए)यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण ५लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र, ओडिशा, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, चंदीगढ, तेलंगणा, तामिळनाडू, चेन्नई, दादर, अहमदनगर या ठिकाणांहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्वीस लीग फॉरमॅट प्रमाणे खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण ९फेऱ्या होणार आहेत.

स्पर्धेत ग्रँडमास्टर मित्रभा गुहा(२४५८), ग्रँडमास्टर वेंकटेश एमआर(२३९४), आयएम सम्मेद शेटे(२२७६), आयएम हिमल गुसेन(२२१५), आयएम रित्विज परब(२१८९), आयएम आयुश शर्मा(२१८८), आयएम समीर कठमाळे(२१८७), आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(२१५५), आयएम अभिषेक केळकर(२१३७), आयएम साई अग्नी जीवितेश(२१२४), एफएम सुयोग वाघ(२२६८), एफएम गौरांग बागवे(१९७१), एफएम ओजस कुलकर्णी(२०७८), सीएम सोहम दातार(२०४२), सीएम गौरव झगडे(२००३) हे मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, उप पंच म्हणून अथर्व गोडबोले, दिप्ती शिदोरे,अजिंक्य पिंगळे, गौरव रे, जुईली कुलकर्णी, पौर्णिमा उपळावीकर, शार्दुल तपासे, दिपक वायचळ हे काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन १२ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे आणि दि उगर शुगर वर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक चंदनसाहेब शिरगांवकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उल्हास माळी,प्रमोद चौगुले,चिंतामणी लिमये,सीमा कठमाळे,अविनाश चपळगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.