July 26, 2024

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत डॉमिनिक पालनचा मानांकीत खेळाडूला पराभवाचा धक्का

पुणे, 3 मार्च 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या बिगर मानांकीत डॉमिनिक पालन याने तैपैईच्या दुस-या मानांकीत चुन-सिन त्सेंग याचा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत 2तास 18 मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक 412 असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या क्वालिफायर बिगर मानांकीत डॉमिनिक पालन याने जागतिक क्रमांक 131 असलेल्या तैपैईच्या दुस-या मानांकीत चुन-सिन त्सेंग याचा 7-6(4), 1-6, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. सामन्यात सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व 6-6 अशी बरोबरी निर्माण झाली. टायब्रेकमध्ये डॉमिनिकने आक्रमक खेळी करत सुरूवातीलाच 6-4 अशी आघाडी घेतली व आपली आघाडी कायम ठेवत पहिला सेट 7-6(4) असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये डॉमिनिकला आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही चुन-सिन त्सेंग याने चौथ्या व सहाव्या गेममध्ये डॉमिनिकची सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेट 6-1 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिस-या व निर्णायक सेटमध्ये डॉमिनिकने सामन्यात पुनरागमन करत सहाव्या गेममध्ये चुन-सिन त्सेंगची सर्हिस ब्रेक करत तिसरा सेट 6-3 असा सहज जिंकत सामन्यात विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत 158 व्या स्थानी असलेल्या इटलीच्या चौथ्या मानांकीत लुका नार्डी याने जागतिक क्रमांक 210 असलेल्या जपानच्या आठव्या मानांकीत रिओ नोगुचीचा 6-3, 6-0 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना 1 तास 11मिनीट चालला. जागतिक क्रमांक 155 असलेल्या ऑस्ट्रेलीयाच्या तिस-या मानांकीत मॅक्स पर्सेल याने जागतिक क्रमांक 178 असलेल्या इटलीच्या पाचव्या मानांकीत फ्रान्सिस्को मेस्ट्रेली याचा केवळ 56 मिनीटात झालेल्या सामन्यात 6-0, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या सर्बियाच्या मिलजान झेकिक याने फ्रान्सच्या हेरॉल्ड मेयोचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.

दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत 1तास 7 मिनिटे चाललेल्या सामन्यात भारताच्या मुकुंद शशिकुमार व विष्णु वर्धन या जोडीला जपानच्या पाचव्या मानांकीत तोशिहिदे मत्सुई व काइतो उसुगी यांच्या कडून 2-6, 5-7 असा पराभव पत्करावा लागला.

दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत या बिगर मानांकीत जोडीला पुढे चाल देण्यात आली. 4-0 अशी स्थिती असताना भारताच्या अर्जुन कढेचा सहकारी ऑस्ट्रियाच्या मॅक्सिमिलियन न्यूक्रिस्टला ताप आल्याने त्याने सामन्यातून माघार घेतली. अंतिम फेरीत भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत या जोडीपुढेजपानच्या पाचव्या मानांकीत तोशिहिदे मत्सुई व काइतो उसुगी यांचे आव्हान असणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुख्य ड्रॉ- उपांत्यपुर्व फेरी- एकेरी गट

डॉमिनिक पालन (चेक प्रजासत्ताक) वि.वि चुन-सिन त्सेंग(तैपैई)(2) 7-6(4), 1-6, 6-3

मॅक्स पर्सेल (ऑस्ट्रेलीया) [3] वि.वि फ्रान्सिस्को मेस्ट्रेली (इटली) [5] 6-0, 6-2

लुका नार्डी (इटली) [4] वि.वि रिओ नोगुची(जपान)(8) 6-3, 6-0

मिलजान झेकिक (सर्बिया)वि.वि हेरॉल्ड मेयो (फ्रान्स) 6-2, 6-4

दुहेरी गट- उपांत्य फेरी

तोशिहिदे मत्सुई/काइतो उसुगी(जपान)(5)वि.वि मुकुंद शशिकुमार /विष्णु वर्धन (भारत) 6-2, 7-5
अनिरुद्ध चंद्रशेखर/एन विजय सुंदर प्रशांत (भारत) वि.वि अर्जुन कढे (भारत)/मॅक्सिमिलियन न्यूक्रिस्ट (ऑस्ट्रिया)(2) 4-0(सामना सोडून दिला)