पुणे, ०९/०६/२०२३: विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून चोरट्याने परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने दोन तरुणींची २२ लाख ८३ हजार ९६९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीची जीवनसाथी डाॅट काॅम विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन विराट पटेल याच्याशी ओळख झाली होती. पटेल याने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. परदेशातील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी पटेल याने तरुणीकडे केली होती. तरुणी आणि पटेल यांच्यातील संवाद वाढल्यानतंर त्याने तिला परदेशातून महागडी भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले.
भेटवस्तू दिल्ली विमानतळावर पोहोचल्या असून सीमाशुल्क विभागाने (कस्टम) ताब्यात घेतल्याची बतावणी त्याने तरुणीकडे केली. कस्टमने ताब्यात घेतलेली भेटवस्तू सोडविण्यासाठी ३२ हजार ९०० रुपये कर भरावा लागणार असल्याची बतावणी त्याने केली. त्यानंतर त्याने तरुणीला तातडीने बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. तरुणीकडून वेळोवेळी १३ लाख ५३ हजार ९६९ रुपये उकळले. तिने या प्रकराची माहिती नातेवाईक आणि एका वकिलाला दिली. तेव्हा विमानतळावर असे प्रकार घडत नाही, असे त्यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.
आरोपी विराट पटेल असे नाव सांगणाऱ्या सायबर चोरट्याने अशाच पद्धतीने नगर रस्त्यावरील खराडी भागात राहणाऱ्या आणखी एका तरुणीला साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
More Stories
..तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खटला भरला पाहीजे – सुप्रिया सुळे
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील ७ मतदान केंद्र स्थलांतरीत
बटेंगे तो कटेंगे घोषणेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत मतभेद