पुणे, दि. ९ जून २०२३: तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषण कंपनीची २२० केव्ही उर्से ते चिंचवड अतिउच्चदाब वीजवाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होण्याचा धोका असल्याने वाकड, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, पिंपळे सौदागर, बावधन, निगडी आदी परिसरात शुक्रवारी (दि. ९) सकाळी पावणे दहापासून दुपारी २ वाजेपर्यंत अर्धा ते दीड तासांपर्यंत चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या २२० केव्ही उर्से ते चिंचवड अतिउच्चदाब वीजवाहिनीद्वारे चिंचवड २२० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. तथापि तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या वीजवाहिनीच्या ७५० ॲम्पीअरपेक्षा अधिक वीज भार (लोड) वाढत असल्याने सुमारे ५० ते ६० मेगावॅट विजेचे भारनियमन आवश्यक झाले. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही चिंचवड व हिंजवडी आणि १३२ केव्ही रहाटणी व एनसीएल या अतिउच्चदाब उपकेंद्राद्वारे विजेचे भारनियमन करण्यास कळविण्यात आले.
त्याप्रमाणे या अतिउच्चदाब उपकेंद्रांशी संलग्न महावितरणच्या वीजवाहिन्यांवर सकाळी पावणे दहापासून अर्धा ते दीड तासांपर्यंत विजेचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागले. यामध्ये हिंजवडी परिसर, वाकड, ताथवडे, थेरगाव, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळ निलख, पुनावळे, बालेवाडी, बाणेर, बावधन, निगडी या परिसराचा समावेश होता. दुपारी दोन वाजताच्या सुमारास उर्से ते चिंचवड अतिउच्चदाब वीजवाहिनीवरील वीजभार कमी झाल्यानंतर या सर्व भागातील विजेचे भारनियमन मागे घेण्यात आले.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान