September 17, 2024

पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने 81 लाखांची फसवणूक

पुणे, २०/०४/२०२३: इन्वस्टमेंट कंपनीत पैसे गुंतवल्यास, चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखवून  तब्बल 81 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ज्ञानेश्वर लक्ष्मण घाडगे (रा. वागळे इस्टेट ,पुणे )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .याप्रकरणी स्वप्निल राजेंद्र धायरकर (वय -३७) यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे .सदरची घटना एप्रिल 2022 ते आतापर्यंत घडलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी ज्ञानेश्वर घाडगे यांनी तक्रारदार स्वप्निल धायरकर याचा विश्वास संपादन करून आरोपीच्या इन्कम रूट इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडले. सुरुवातीला पैसे गुंतवणूक केल्यानंतर त्याचे परताव्याचे पैसे वेळेत दिले गेल्याने तक्रारदार यांचा विश्वास आरोपीवर बसला. याचा गैरफायदा घेत आरोपीने गुंतवणुकीच्या दरमहा टीडीएस वजा करून नऊ टक्के मोबदला देणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले.

त्यानुसार वेळोवेळी गुंतवणुकीसाठी एकूण 81 लाख 50 हजार रुपये घेऊन त्यावरील मोबदला न देता तसेच गुंतवणुकीची रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती समर्थ पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस त्रंबके याबाबत पुढील तपास करत आहे.