September 17, 2024

पुणे: महाविद्यालयीन युवकाला धमकावून अडीच लाख रुपये उकळले, डेक्कन पोलिसांकडून एका विरुद्ध खंडणीचा गुन्हा

पुणे, १६/०४/२०२३: महाविद्यालयीन युवकाला धमकावून त्याच्याकडून अडीच लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका युवकाच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रितेश सोंडकर असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एरंडवणे भागातील एका व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा मार्केट यार्ड भागात व्यवसाय आहे. मार्च महिन्यात करभरणा करायचा असल्याने त्यांनी कुटुंबीयांच्या खात्यातील व्यवहाराची माहिती घेतली. तेव्हा व्यावसायिकाच्या मुलाच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपये आणि त्यानंतर चार वेळा प्रत्येकी २५ हजार रुपये वेगवेगळ्या क्रमांकावर पाठविण्यात आल्याचे लक्षात आले.

व्यावसायिकाने याबाबत मुलाकडे विचारणा केली. तेव्हा त्याने एका युवकाने धमकावून अडीच लाख घेतल्याचे वडिलांना सांगितले. वडिलांनी मुलाची चौकशी केली. पैसे का पाठविले, अशी विचारणा केली. तेव्हा ऑक्टाेबर महिन्यात प्रितेश सोंडकर नावाच्या तरुणाने समाजमाध्यमावर मैत्रीची विनंती पाठविली होती. त्याने मैत्रीची विनंती स्विकारली. त्यानंतर स्नेहल गुरव या युवतीच्या नावे मुलाला संदेश पाठविण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर सोंडकरने समाजमाध्यमातील संवादाचा स्क्रीनशाॅट तुझ्या वडिलांना पाठवितो, असे सांगून महाविद्यालयीन युवकाला धमकावण्यास सुरुवात केली, अशी माहिती चौकशीत उघड झाली.

वडिलांनी सोंडकरचा मोबाइल क्रमांक बंद (ब्लाॅक) केला. त्यानंतर सोंडकरने व्यावसायिकाच्या दुकानातील कामगारांना दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. व्यावसायिकाने डेक्कन पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. सोंडकर याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.