September 14, 2024

पुणे : गुंतवणुकीच्या बहाण्याने कोट्यावधींचा गंडा घालणारे जेरबंद, ४४ जणांना तब्बल २ कोटी ९३ लाखांचा गंडा

पुणे, दि. १६/०४/२०२३: गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक करणार्‍यासह दोघांना पुणे सायबर पोलिसांनी िंहजवडीतून अटक केली आहे. आरोपींनी ४४ जणांची तब्बल २ कोटी ९३ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. क्रिप्टोब्रिझ एक्सचेंजच्या माध्यमातून युट्युबवर ऑनलाइन प्रसिद्धी करत आरोपींनी देशभरातील नागरिकांना कोट्यावधीचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

राहुल विजय भाई राठोड (वय ३५ ,रा.हिंजवडी, ,मूळ. रा. गुजरात) आणि साथीदार ओमकार दिनकर सोनवणे (वय २५ ,रा.कोंढवा )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रविशंकर पाटील (वय ३२ ,रा. इस्लामपूर, सांगली) यांनी तक्रार दाखल केली आहे.
आरोपी राहुल राठोड याने २०१९ मध्ये क्रिप्टोब्रिझ कंपनीची स्थापना केली.

गुंतवणूकदारांना एक्सचेंजच्या माध्यमातून अल्पावधीत जादा परतावा देण्याचे अमिष त्याने दाखवले. त्यासाठी गोल्ड ,सिल्वर, प्लॅटिनम, ट्रायल असे वेगवेगळे गुंतवणुकीचे प्लॅन तयार केले. ठराविक दिवसात जादा परतावा मिळेल असे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले. त्याशिवाय ट्रेडर्स डेस्टिनेशन नावाने युट्युबवर त्याने ऑनलाईन व्हिडिओद्वारे अनेकांना भुरळ घातली. गुंतवणूक करणार्‍यांना यूएसडी कॉईनमध्ये एक रुपयाचे डिस्काउंट मिळेल असेही आमिष दाखविले. त्याद्वारे त्याने देशभरातील विविध शहरातून गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या काळात परतावा देउन लोकांचा विश्वास संपादित केला.

मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा देण्याचे बंद करीत कोंढवा परिसरातील कंपनीचे कार्यालय बंद केले. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पुणे सायबर पोलिसांनी तपास करुन आरोपीला िंहजवडीतून बेड्या ठोकल्या. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी विजयकुमार पळसुले, वरिष्ठ निरीक्षक मीनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, उपनिरीक्षक तुषार भोसले, उपनिरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक संदीप कदम, प्रवीण राजपूत, राजकुमार जाबा, संतोष जाधव, नवनाथ कोंडे, बापू लोणकर, नवनाथ जाधव, नीलेश लांडगे, पूजा मांदळे, सोनाली चव्हाण, सुनैना मोरे यांनी केली.