July 27, 2024

पुणे : वडगाव शिंदे येथे मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला; नेकलेससाठी नखे कापल्याप्रकरणी चार जणांना अटक

पुणे, १० फेब्रुवारी २०२४: वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत वडगाव शिंदे, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे दि ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी 7 वा शेतकरी नवनाथ खांदवे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना ऊस तोडणी मजुरांना एक बिबट्या मृत असल्याचे दिसून आले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मादी बिबट्याला (वय अंदाजे 10 महिने) ताब्यात घेतले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मादी बिबट्याचा मृत्यू कुत्र्यांच्या हल्ल्यात झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.

मृत बिबट्याचे पुढील उजव्या पायाची 3 नखे तसेच मागचा उजव्या पायाचा पंजा देखील गायब असल्याचे दिसून आले. दि 9 फेब्रुवारी २०२४ रोजी मृत बिबट्याचे शव विच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची 3 नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास केला. ऊस तोडणी मजूर यांच्या कडे चौकशी केली असता सुरवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

यावेळी वनाधिकाऱ्यांनी पुरुष मजूर, मुले, महिला यांना वेगवेगळे करून स्वतंत्र चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे ३ नखे व पायाचा पंजा व त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. सर्व आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी आम्ही गुन्हा केल्याचे सांगितले.

आरोपी कडून बिबट्याचे 4 नखे १ पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले ३ सुरे जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे व 3 बालअपचारी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई एन आर प्रवीण भा व से मुख्य वनसंरक्षक पुणे वन वृत यांच्या मार्गदर्शनाखाली व महादेव मोहिते भा व से उपवनसंरक्षक पुणे वन विभाग यांच्या नेतृत्वात आशुतोष शेंडगे सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वरक वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे सीमा मगर वनपाल, अनिल राठोड वनरक्षक तसेच रेस्क्यू संस्थेचे तुहिन सातारकर, किरण रहाळकर, वाइल्डलाइफ डिटेक्शन डॉग खंडू, डॉ चेतन वंजारी,अमित तोडकर, नरेश चांडक, श्रीनाथ चव्हाण, एकनाथ मंडल यांनी केली.