September 10, 2024

पुणे: जेष्ठ महिलांना गंडा घालणार्‍या टोळीचा पर्दापाश , १२ लाख ४४ हजारांचा ऐवज जप्त

पुणे, दि. २२/०३/२०२३:  जेष्ठ महिलांना लक्ष्य करीत त्यांना सोन्याची वेढणी दाखवून बनावट दागिने देत गंडा घालणार्‍या सराईत टोळीचा हडपसर पोलिसांनी पर्दापाश केला आहे. संबंधित टोळीला   अटक करीत त्यांच्याकडून सोन्याच्या आमिषाने फसवणूकीचे १० गुन्हे उघडकीस आणून १२ लाख ४४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

गणेश विनायक गायकवाड (वय ३२ रा.मु.पो.  पाथर्डी जि. नगर)  रमेश विनायक गायकवाड (वय ३०  पाथर्डी जि. नगर )  बंडु लक्ष्मण जाधव (वय ४२ रा.नाळवंडी नाका, गांधीनगर ता.बीड) हरिभाऊ मोहन कासुळे (वय ३५रा. भालगाव, कासुळे वस्ती, ता. पाथर्डी जि.  नगर) महादेव आसाराम जाधव (वय ५० रा. मु. पिट्टी पो. निरगुडी, ता. पाटोदा जि.बिड)   यांना अटक केले आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन २०२१ ते फेब्रुवारी २०२३  काळात गाडीतळ बसस्टॉप आणि परिसरातुन ज्येष्ठ नागरिक महिलांना हेरून गंडा घालण्यात आला होता.  सोन्याचे बिस्कीटासारखे बनावट दागिने रस्त्यात टाकून प्रवासी महिलांना लक्ष्य केंद्रीत केले जात.   महिलेने रस्त्यावरील दागिना घेताच आरोपी त्या महिलेस आम्हीही दागिना पाहीला आहे. आपण  वाटून घेऊ असे म्हणत जाळ्यात अडवित होते. त्यानंतर जाड वेढणी तोडता येणार नाही, त्याबदल्यात तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने मला द्या आणि वेढणी तुम्हाला घेउन जा, असे चोरट्यांकडून सांगितले जात होते. जेष्ठ महिलांकडून स्वतःचे अंगावरच्या दागीन्यापेक्षा  सापडलेले दागिने जास्त वजनाचे व किंमतीचे असल्याने स्वत:जवळील सोने चोरट्यांना दिले जात होते.

आरोपींच्या भुलथापांना बळी पडल्यामुळे हडपसरमध्ये ७ गुन्हे दाखल झाले होते. त्याशिवाय भारती विद्यापीठमध्ये दोन आणि भोसरीमध्ये एक अशापद्धतीने गुन्हे घडले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आरोपींची वेशभुषा, देहबोलीचा अभ्यास केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी बीडमध्ये असल्याची माहिती अमलदार संदीप राठोड यांना मिळाली. चोरी केल्यानंतर ते पुणे शहरासह जेजुरीमध्ये चार पाच दिवस मुक्काम करुन पुन्हा बीडला जात होते. बनावट वाहन क्रमांक लावुन चोरी करण्यासाठी निघालेल्या टोळीला विश्रांतवाडीतून ताब्यात घेण्यात आले.

आरोपींनी हडपसर गाडीतळ, कात्रज बस डेपो, भोसरी बस डेपो, चाकण बस डेपो या ठिकाणी दोन वर्षापासून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.  त्यांनी केलेल्या २४ पेक्षा अधिक घटनांची माहीती दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक,  अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पीआय दिगंबर शिंदे, पीआय विश्वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे यांच्या पथकाने केली.