December 14, 2024

पुणे: टेम्पोसह विहिरीत पडलेल्या चालकाची सुटका

पुणे, २२/०३/२०२३: टेम्पोसह चालक विहीरीत पडल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत पडलेल्या टेम्पोचालकाची सुटका केली. जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला.

विनोद पवार (वय ३५) असे बचावलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात पुरंदर वाॅशिंग सेंटरजवळ एक जण टेम्पोसह विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्राला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके, बंडू गोगावले, वसंत भिलारे, किरण पाटील, शुभम शिर्के, संकेत शेलार, धीरज जगताप यांनी तेथे धाव घेतली. विहीरीत दोर सोडण्यात आला. विहीरीत पडलेल्या टेम्पोचालकाशी जवानांनी संवाद साधून त्याला धीर दिला.

जवान विहीरीत उतरले. दोराच्या सहायाने विहिरीत पडलेल्या टेम्पोचालकाला बाहेर काढण्यात आले. टेम्पोचालक पवार याची चौकशी करण्यात आली. तेव्हा टेम्पो वाॅशिंग सेंटरमध्ये आणण्यात आला होता. टेम्पाे मागे घेण्यात येत असताना विहीरीत पडल्याची माहिती पवरा यांनी दिली. पवार यांना किरकोळ दुखापत झाली असून जवानांनी त्वरीत मदत उपलब्ध केल्याने अनर्थ टळला.