May 16, 2024

पुणे: शेतीपयोगी साहित्याची चोरी करणार्‍या टोळीला बेड्या, तब्बल ११ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त

पुणे, दि. २४/०३/२०२३: शेती उपयोगी साहित्य चोरी करणार्‍या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नगरमधील पारनेरमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून  पाणबुडी मोटार, बोअर मोटार,  मल्चिंग पेपर, दोन वाहने असा ११ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीने नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दुकानांमधील ऐवज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

सुभाष भोराजी दुधवडे वय २७  गजानन धावजी दुधवडे, वय  दोघे रा. पारदरा, वारणवाडी, पोखरी ता पारनेर  नगर   अजय रंगनाथ वाघ वय २६ रा. गुरेवाडी, म्हसोबा झाप ता. पारनेर   सोन्याबापू गेणभाऊ मधे  वय २३ भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे वय २८   खंदरमाळ, माळवदवाडी ता संगमनेर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शेती साहित्याचे दुकानांमध्ये चोरी झाल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास करण्यात येत होता. पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि पोलीस निरीक्षक  अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महादेव शेलार, दिपक साबळे,  संदिप वारे,  अक्षय नवले यांनी तांत्रिक तपास केला. त्यावेळी घरफोडी करीत ऐवजाची चोरी पारनेरमधील चोरट्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने पारनेरमध्ये धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून   मल्चिंग पेपर, बोअर मोटार, पाणबुडी मोटार, शेती पंप, दोन वाहने असा साडेअकरा लाखांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक  अंकित गोयल, अपर अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय महादेव शेलार, तुषार पंदारे,  दिपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीण, जनार्दन शेळके,  संदिप वारे,  अक्षय नवले,  दगडु विरकर,  अक्षय सुपे यांनी केली.

“नारायणगावमधील दोन दुकानातील शेतीपयोगी साहित्याची चोरी करणार्‍या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनांसह इतर शेतीपयोगी साहित्य मिळून ११ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.” – अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण