October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: जुन्या भांडणातून तरूणावर वार, हवेत कोयता फिरविला

पुणे, दि. २१/०८/२०२३: जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना १९ ऑगस्टला रात्री सव्वा आठच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवी खडकी परिसरात घडली. टोळक्यातील एकाने हातातील कोयता हवेत फिरवून आम्हीच इथले भाई आहोत, असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली.

जय भडकुंभे वय २२, ऋषभ भडकुंभे वय २३, मंगल भडकुंभे वय ५०, रोहन मोहिते वय २१ सर्व रा. कंजारभाट, येरवडा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अभिजीत कुलकर्णी वय २१ रा. यशवंतनगर, येरवडा असे जखमीचे नाव आहे.

फिर्यादी अभिजीत आणि आरोपींची काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच रागातून भडकुंभे कुटूंबियाने १९ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास अभिजीतला गाठले. आरोपी जयने त्याला फायटरने मारहाण केली. ऋषभने कोयत्याने अभिजीतवर वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर हातातील कोयता हवेत फिरवून आम्हीच इथले भाई आहोत, असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करीत आहेत.