October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवा क्र. ३ चा शुभारंभ

पुणे, २०/०८/२०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेली पर्यटन बससेवा पर्यटकांच्या पसंतीस उतरत असून रविवार दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा या पर्यटन स्थळांसाठी नव्याने सुरु केलेल्या पर्यटन बससेवा क्र. ३ चा शुभारंभ पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
यावेळी चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) श्री. सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे, वाहतूक नियोजन अधिकारी श्री. विजय रांजणे, न.ता.वाडी डेपोचे डेपो मॅनेजर श्री. संतोष किरवे,  पुणे स्टेशन डेपोचे डेपो मॅनेजर श्री. संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमपीएमएल च्या डेक्कन जिमखाना बसस्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. ३ चा शुभारंभ करण्यात आला. पर्यटन बससेवा क्र. ३ द्वारे पहिल्याच दिवशी २५ पर्यटकांनी सफर केली.
पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत बसेसव्दारे विशेष ‘पर्यटन बस’ सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दि. ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर रूपये ५००/- इतका आकारण्यात येतो.
या वेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले कि, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून किफायतशीर दरात सुरू करण्यात येत असलेल्या वातानुकूलीत पर्यटन बससेवेचा लाभ भक्तगण, भाविक व पर्यटक यांनी घ्यावा तसेच नागरिक यांनी खासगी वाहनांचा वापर न करता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील बस सेवेचा वापर करावा.
 पर्यटन बससेवा क्र. ३ चा मार्ग व सुटण्याची वेळ.
 मार्ग – डेक्कन जिमखाना, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन जिमखाना.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००.
 बस पोहोचण्याची वेळ – १७:००.
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – डेक्कन जिमखाना बस स्थानक.
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
 बुकिंग ठिकाण – १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ,
                       ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या महामंडळाच्या पास केंद्रावरून.
तरी पीएमपीएमएल च्या किफायतशीर दरात असणाऱ्या पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा असे घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.