July 27, 2024

पुणे: पाटील इस्टेट परिसरात दहशत माजविणाऱ्या इराणी टोळीवर मोक्का कारवाई

पुणे, १३/०५/२०२३: जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पाटील इस्टेट परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

जमीर कंबर इराणी (वय २३), कासीम आबालू इराणी (वय २३), मोहमद शौकत शेख (वय ३०), मेहंदीहसन कंबर इराणी (वय ३०), जैनब फिदा इराणी (वय २१), शहजादी उर्फ मुथडी जावेज इराणी (वय ४३), सोगरा उर्फ नरगिस समीर इराणी (वय २४, सर्व रा. महात्मा गांधी वसाहत, जुना मुंबई-पुणे रस्ता, पाटील इस्टेट परिसर) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. इराणी टोळीने पाटील इस्टेट परिसरात दहशत माजविली होती. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

या टोळीच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक वैभव मगदूम, राजकिरण पवार, रमेश जाधव यांनी तयार केला हाेता. अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी इराणी टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले.