October 3, 2024

पुणे: बिटकॉइन मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा

पुणे, १३/०५/२०२३: बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला ऑनलाईन एक कोटी बारा लाख 60 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपींवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

याबाबत हरिश्चंद्र राजाराम काळे (वय- 46 ,राहणार- वडगाव शेरी, पुणे) यांनी आरोपी विरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड आणि आज्ञात दोन मोबाईल धारक यांच्या विरोधात सदर गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. संबंधित प्रकार 20/ 9 /2021 ते आत्तापर्यंत घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हुडहेड यांनी तक्रारदार हरिश्चंद्र काळे यांच्याशी मोबाईल व ईमेलद्वारे संपर्क केला. त्यांना ट्रेडएक्स डॉट कॉम ट्रेडिंग साईटमध्ये मधून बोलत असल्याचे भासवले. सदर वेबसाईटच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास, मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल असे आमिष आरोपींनी दाखवले.

त्यानुसार वेळोवेळी एकूण एक कोटी बारा लाख 60 हजार रुपयांचे 2.796366 बिटकॉइन स्वीकारून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी त्याचा वापर करून संबंधित रकमेची तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. याबाबत सायबर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील पुढील तपास करत आहे.