November 11, 2024

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणेकरांनी गाठला लाखाचा टप्पा; १ कोटी २० लाख रुपयांची वार्षिक बचत

पुणे, दि. १३ मे २०२३: वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजने अंतर्गत पुणे परिमंडलाने राज्यात आघाडी घेतली असून या योजनेमुळे एक लाख सात वीजग्राहकांची तब्बल एक कोटी २० लाख ८४० रुपयांची वार्षिक बचत होत आहे.

‘समृद्ध पर्यावरणासाठी ‘गो-ग्रीन’ योजना काळाची गरज आहे. ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल, भरणा तसेच मासिक वीज वापर आदींची माहिती महावितरण मोबाईल ऍप व वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून या योजनेत आणखी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हावे’. – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल.

गेल्या फेब्रुवारीपासून या योजनेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या पर्यावरणस्नेही ७ हजार १९४ वीजग्राहकांची भर पडली आहे. राज्यात ३ लाख ८७ हजार ७५७ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये पुणे परिमंडलामध्ये सर्वाधिक १ लाख ७ त्यानंतर कल्याण- ४२ हजार २१४ व भांडूप परिमंडलामध्ये ३७ हजार ३९६ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात ५३ हजार २७३ ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर-१ उपविभागामधील ६ हजार ५०, वडगाव धायरी- ५ हजार १८४, धनकवडी– ४ हजार ९००, औंध- ४ हजार ३६५ आणि विश्रांतवाडी उपविभागामध्ये ३ हजार ८५७ ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड शहरात ‘गो-ग्रीन’मध्ये २९ हजार २०५ वीजग्राहक सहभागी झाले आहेत. यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ९ हजार ४२, चिंचवड – ५ हजार ६६१ आणि आकुर्डी- ५ हजार ५२५ मोठ्या संख्येने योजनेत सहभागी आहेत. तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १७ हजार ५२९ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४ हजार ७१२ वीजग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.

वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.