September 17, 2024

पुणे: आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणारा बुकी जाळ्यात, गुन्हे शाखा यूनिट तीनची कारवाई

पुणे, ०७/०४/२०२३: इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावर सट्टा घेणार्या बुकीला गुन्हे शाखा यूनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली.

आकाश धरमपाल गोयल (30, रा. निंबाळकरनगर, लोहगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावर गोयल हा सट्टा घेत असल्याची माहिती यूनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. त्यानूसार पथकाने सापळा रचून गोयल याला येरवड्यातील गुंजन टॉकीज परिसरातून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने 31 मार्चपासून आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, सुजीत पवार, संजिव कळंबे, राकेश टेकावडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.