पुणे, १२ फेब्रुवारी २०२६ : शहरातील नदी स्वच्छतेच्या घोषणा सुरू असतानाच टिळक पुलालगतच्या नदीपात्रात मध्यरात्री तब्बल २० ट्रक राडारोडा टाकून नदीची उघडपणे गळचेपी केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून हाकेच्या अंतरावर घडल्याने प्रशासनाचीच प्रतिष्ठा धुळीस मिळाली. संतप्त प्रशासनाने थेट कठोर कारवाई करत आकांक्षा डेव्हलपर्सचा प्रकल्प सील केला, १० लाखांचा दंड ठोठावला आणि संबंधित विकसक निहाल शेख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट इशारा दिला, “नदीपात्रात राडारोडा टाकण्याचा गुन्हा कोणाच्याही पचनी पडणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून काम बंद केले जाईल. शहराच्या पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.”
प्राथमिक तपासात हा राडारोडा शिवाजीनगर तोफखाना परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातून आल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रशासनाने मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत शोधमोहीम राबवली. तपासात आकांक्षा डेव्हलपर्सकडूनच नदीत राडारोडा टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तातडीने नोटीस बजावत बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आणि प्रकल्पस्थळी सील ठोकण्यात आले.
चलनाशिवाय प्लिंथ नाही!
आयुक्त राम यांनी नवी कार्यपद्धती जाहीर करत स्पष्ट केले की, यापुढे सर्व बांधकाम व्यावसायिकांनी राडारोडा अधिकृत सीएनडी प्रकल्पावरच टाकणे बंधनकारक राहील. त्यासाठी अधिकृत चलन सादर करणे आवश्यक असेल. प्लिंथ तपासणीवेळी हे चलन तपासले जाईल; चलन नसल्यास प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. “प्रमाणपत्रासाठी नियम पाळावेच लागतील,” असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला.
अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनालाच जाब विचारला. “महापालिकेच्या इतक्या जवळ नदीपात्रात राडारोडा टाकला जातो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधित बांधकाम निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी ठणकावले.
नदी संवर्धनाच्या घोषणा आणि प्रत्यक्षात नदीपात्रात कचऱ्याचे ट्रक — या दुटप्पी वास्तवावर आता महापालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. मात्र ही कारवाई अपवाद ठरणार की पुढेही अशीच ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका कायम राहणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय