May 14, 2024

पुणे: येरवडा कारागृहात कैद्यांकडून घुमणार टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-अभंग स्पर्धेची अंतिम फेरी १३ जूनला

पुणे, दि. ८/०६/२०२३: कारागृहातील कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येरवडा कारागृहात भजन-अभंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ जूनला होणार आहे. त्यासाठी राज्यातील सहा कारागृहातून भजनी संघाची निवड करण्यात आली आहे.कारागृहात कैद्यांकडून टाळ-मृदंगाचा निनाद करीत महाकरंडकावर बाजी मारली जाणार आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अभिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने भजन-अभंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्राथमिक फेरीत येरवडा, कोल्हापूर, सातारा, नगर, मुंबई, ठाणे, तळोजा, कल्याण, रत्नागिरी, सावंतवाडी, संभाजीनगर, नाशिक, धुळे, परभणी, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, वाशिम कारागृहातील ३५० कैद्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपुर, नाशिक कारागृहातील संघाची निवड करण्यात आली आहे. त्यातच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १३ जूनला पुणे मुक्कामी आहे. त्याअनुषंगाने दोन्ही पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे.

राज्यातील विविध कारागृहात असलेल्या वैâद्यांचे मन गुंतवून ठेवण्यासाठी नाविण्यपुर्ण उपक्रमांना गती देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त स्पर्धेची महाअंतिम फेरी आयोजित करण्यात आली आहे. मागील दीड महिन्यांपासून वैâद्यांकडून भजन आणि अभंग गाण्याची तयारी सुरु आहे. त्याद्वारे आता येरवडा कारागृहात टाळ-मृदंगाचा आवाज घुमणार आहे.