June 24, 2024

पुणे शहर ही देशातील मेट्रो शहरांमध्ये परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी रिअल इस्टेट बाजारपेठ

पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२३ : भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील रिअल इस्टेट बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी बाजारपेठ असल्याचे क्रेडाई सीआरई अहवालाद्वारे समोर आले आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या कार्यालयातील सभागृहात संपन्न झालेल्या मेंबर असिस्टंस मिटींगमध्ये क्रेडाई सीआरई अहवाल नुकताच सादर झाला. यावेळी पुणे शहरातील रिअल इस्टेटशी संबंधित अनेकविध विषयांवर चर्चाही झाली.

सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आणि डेटा अॅनालिस्ट राहुल अजमेरा यांनी हा अहवाल सर्वांसमोर मांडला. क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापकीय समिती सदस्य अभिषेक भटेवरा आणि महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या अहवालासंदर्भात बोलताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, “क्रेडाई पुणे मेट्रोने नॉलेज पार्टनर म्हणून सीआरई मॅट्रिक्सची नेमणूक केली याबद्दल आम्ही समाधानी आहोत. या अहवालातील माहिती ही विश्वसनीय अशा नोंदणी व मुद्रांक विभाग आणि रेराकडून उपलब्ध करून दिलेल्या माहितीमधून घेण्यात आली आहे. या अहवालानुसार मागील सहामाहीत (जानेवारी- जून २०२३) समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहराची रिअल इस्टेट बाजारपेठ ही भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढणारी आणि परवडणारी बाजारपेठ आहे. जानेवारी ते जून २०२३ दरम्यान पुनर्विक्री वगळून पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये तब्बल ४५ हजार घरांची विक्री झाली आहे. याची किंमत ही तब्बल २८ हजार कोटी रुपये इतकी असून २०१९ च्या तुलनेत यामध्ये ९०% वाढ झाल्याचेही पहायला मिळाले आहे. याचाच अर्थ पुणे रिअल इस्टेट मार्केटने गेल्या ४ वर्षांत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.”

यावेळी बोलताना अभिषेक गुप्ता म्हणाले, “२०१९ आणि २०२३ च्या पहिल्या सहामाहीचा विचार केल्यास पुणे शहरात २०२३ मध्ये ४५,१६२ घरांची विक्री झाली. २०१९ साली पहिल्या सहामाहीत घरांची विक्री ही ३२,२५० इतकी होती. याचाच अर्थ कोविड पूर्व काळाच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीत घरांची विक्री हे ४०% नी वाढली आहे.” याबरोबरच पुण्यात २०२३ साली पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही ६३ लाख असून २०१९ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ही ३७% नी जास्त असल्याचे समोर आले आहे. यावरून असे लक्षात येते की घरांचा सरासरी आकार आणि किंमत या दोन्ही गोष्टी वाढत आहेत. शिवाय २०१९ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या सहामाहीत १ कोटी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत तबल २५०% इतकी वाढ झाली आहे, याकडे गुप्ता यांनी लक्ष वेधले.