June 14, 2024

पुणे: ऑनलाइन टास्कच्या आमिषाने संगणक अभियंत्याला दहा लाखांचा गंडा

पुणे, २०/०५/२०२३: ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याला नऊ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध चंदनगर पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका संगणक अभियंता तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण संगणक अभियंता आहे. तो नोकरीच्या शोधात होता. तरुणाला चोरट्यांनी एक संदेश पाठविला होता. घरातून ऑनलाइन कामाची संधी आहे. समाजमाध्यमातील जाहिराती, ध्वनीचित्रफितीस दर्शक पसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यानंतर ऑनलाइन टास्कमध्ये आणखी काही रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले हाेते.

तरुणाने चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी नऊ लाख ७५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. चोरट्यांचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी संबंधित गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करत आहेत.