पुणे, २०/०५/२०२३: पुणे स्टेशन परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून ६३ किलो गांजा,दोन मोबाइल संच असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंतू रामबाबू राय (वय ३० ,रा. कव्वा चौक, जोरपूर, जि. समस्तीपूर, बिहार), राकेशकुमार रामनाथ दास (वय १९, रा. खुसरुपूर, जि. पाटणा, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्सल विभागाजवळ दोघे जण थांबले असून ते गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून राय आणि दास यांना पकडले.
त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. दोघांकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा ६३ किलो ६९४ ग्रॅम गांजा, मोबाइल संच, पिशवी असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक फौजदार शिवाजी घुले, योगेश मांढरे, संतोष देशपांडे, प्रशांत बोमदांडी, संदीप जाधव, महेश साळुंखे, साहिल सय्यद शेख, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्तेवाड आदींनी ही कारवाई केली.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन