May 16, 2024

पुणे: पाच हजारांची लाच मागणार्‍या मुख्याध्यापकावर गुन्हा

पुणे, २५/०५/२०२५: टँकरचे बिल मंजुर केल्याचा मोबदला म्हणून स्वतःसाठी व कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या जुन्नर येथील मुथाळने येथील शासकीय आश्रम शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकावर ओतूर पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण दगडू महाकाळ (57, रा. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. याबाबत एका टँकर पुरवठा करणार्‍या तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार दिली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा व्यावसाय आहे. त्यांनी मुथाळने शासकीय आश्रमशाळा येथे टँकरने पाणी पुरवठा केला होता. दरम्यान टँकरेचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून अरूण महाकाळ स्वतःसाठी व इतर कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करत होता. त्यामुळे तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी 3 एप्रिल रोजी करण्यात आली. दरम्यान महाकाळ याने मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विरनाथ माने यांनी केली.